मृतांमध्ये 2 मुलांचा समावेश : सीरिया सरकार संतप्त
वृत्तसंस्था/दमास्कस
रशियाने सीरियात बंडखोरांच्या नियंत्रणाखालील भागांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात दोन मुलांसमवेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हे हवाई हल्ले इदलिब प्रांतातील जिस्त्र अल-शुघुर शहरातील बाजारपेठ तसेच जबल अल जाविया भागात झाले आहेत. सीरियाने या हल्ल्यांना नरसंहारासमान ठरविले आहे. हा हवाई हल्ला सीरियातील रशियाकडून झालेला चालू वर्षातील सर्वात घातक हल्ला आहे. मागील आठवड्यात रशियाकडून करण्यात आलेल्या एका ड्रोन हल्ल्यात दोन मुलांसमवेत 4 जणांना जीव गमवावा लागला होता अशी माहिती ब्रिटन स्थित सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सचे प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी दिली आहे. 23 जून रोजी करदाहा शहरावर बंडखोरांनी हल्ला केला होता. हे शहर रयिशाच्या हमीमिम वायुतळानजीक आहे तसेच सीरियन अध्यक्ष बशर-अल-असाद हे मूळचे याच शहरातील आहेत. सीरियात मागील 12 वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे. 2011 मध्ये सीरियातील लोकांनी असाद यांच्या हुकुमशाहीविरोधात निदर्शने सुरू केली होती. यानंतर 2015 मध्ये रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी सीरियाचे अध्यक्ष असाद यांच्या मदतीसाठी रशियाचे सैन्य तेथे पाठविले होते. तर 2016 मध्ये सीरियातील गृहयुद्धात तुर्कियेने उडी घेतली होती. सीरियातील बंडखोरांच्या समर्थनार्थ तुर्कियेने स्वत:चे सैन्य पाठविले होते. रशियाने अलिकडेच काही शहरांमधून बंडखोरांना हुसकावून लावण्यात आले होते. येथून विस्थापित झालेल्या सुमारे 40 लाख लोकांची वापसी देखील रशियानेच करविली होती.









