युक्रेननंतर स्वीडन अन् फिनलंड नाटो सदस्यत्वासाठी इच्छुक
रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. याचदरम्यान रशियाच्या विमानाने आमच्या हवाईक्षेत्रात घुसखोरी केल्याचे स्वीडनने म्हटले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा बॉर्नहोम बेटानजीक बाल्टिक सागरात घडली आहे. रशियाच्या एएन-30 प्रोपेलर विमानाने स्वीडिश हवाईक्षेत्राच्या दिशेने उड्डाण केल्याचे स्वीडनच्या सशस्त्र दलांनी म्हटले आहे.
स्वीडनच्या संरक्षणमंत्री पीटर हल्टक्विस्ट यांनी रशियाच्या घुसखोरीला अस्वीकारार्ह ठरविले आहे. अशाचप्रकारे मार्चच्या प्रारंभी रशियाच्या 4 लढाऊ विमानांनी बाल्टिक समुद्रावरील स्वीडिश हवाईक्षेत्राचे उल्लंघन केले होते. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर स्वीडन आणि फिनलंड दोघेही नाटो सदस्यत्वासंबंधी विचार करत आहेत. तर याप्रकरणी गंभीर परिणामांची धमकी रशियाने दिली आहे.
नाटो सदस्यत्वासाठी एकत्रित अर्ज करण्यावर स्वीडन आणि फिनलंड यांच्यात सहमती झाली आहे. जून महिन्यात दोन्ही देशांकडून यासंबंधी अर्ज केला जाऊ शकतो. मागील वर्षी युक्रेनने नाटोमध्ये सामील होण्याची घोषणा केली होती. यामुळे रशियासोबत दीर्घ तणावानंतर पूर्व युरोपमध्ये भीषण युद्ध पेटले आहे.
फिनलंड आणि स्वीडन हे रशियाच्या अत्यंत नजीक असणारे देश आहेत. फिनलंडची सीमा रशियाला लागून आहे. फिनलंड दीर्घकाळापासून तटस्थ देशाच्या भूमिकेत राहिला आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर आता फिनलंडला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल भीती वाटू लागली आहे.









