अनेक देशांमध्ये दुष्काळाचा धोका; संयुक्त राष्ट्र संघाचा इशारा
न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्र संघाने (युएन) सतर्कता संदेश जारी करत रशिया- युक्रेन युद्धामुळे लवकरच जागतिक अन्नसंकट उद्भवू शकते, असे म्हटले आहे. या संकटाचे परिणाम पुढील काही वर्षे भोगावे लागतील, असेही स्पष्ट केले आहे. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे काही देशांना आगामी काळात दीर्घकालीन दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.
रशिया- युक्रेन युद्धाने युपेनच्या बंदरांवरून होणारा पुरवठा कमी झाला आहे. या देशांमधून पूर्वी मोठय़ा प्रमाणात गोडय़ा तेलाची निर्यात केली जात होती. आता जगातील मका, गहू यासारख्या धान्यांच्या निर्यातीवरही त्याचा फार विपरित परिणाम झाल्यामुळे जागतिक अन्नपुरवठा कमी झाला आणि पर्यायी पदार्थांच्या किमती वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
गेल्या वषीच्या याच कालावधीच्या तुलनेत जागतिक अन्नधान्याच्या किमती जवळपास 30 टक्क्मयांनी वाढल्या आहेत. रशिया- युक्रेन युद्ध, हवामान बदल आणि कोरोनाचा विळखा आदी समस्यांमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्मयात येण्याची भीती आहे. जगाच्या अनेक देशांमध्ये अन्न असुरक्षितता वाढत असताना कुपोषणाची समस्याही बळावू शकते. मोठय़ा प्रमाणावर उपासमार होऊ शकते. रशिया-युपेन युद्ध चालू राहिल्यास येत्या काही महिन्यांत आपल्याला जागतिक अन्नटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे युनायटेड नेशन्सचे (युएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले. युपेनचे अन्न उत्पादन तसेच रशिया आणि बेलारुस या दोन्ही देशांनी उत्पादित केलेले खत जागतिक बाजारपेठेत परत आणणे हाच या संकटावर एकमेव प्रभावी उपाय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रशिया आणि युक्रेन जगातील सुमारे 30 टक्के गव्हाचे उत्पादन करतात. युद्धापूर्वी युपेनकडे जगाचे ब्रेड बास्केट म्हणून पाहिले जात होते. युक्रेन आपल्या बंदरांमधून महिन्याला 4.5 दशलक्ष टन कृषी उत्पादनांची निर्यात करत असे. परंतु 24 फेब्रुवारी रोजी रशियाने आक्रमण सुरू केल्यापासून, त्याची निर्यात कमी झाली आहे. परिणामी जगभरातील अन्नपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच भारताने नुकतीच गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर चिंतेत अधिकच भर पडली आहे.
भारतावरही परिणाम
सध्या सुरू असलेल्या रशिया-युपेन युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. विशेषतः भारतीय बाजारपेठ कोरोना महामारीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ महागाईला प्रोत्साहन देत आहे. साहजिकच भारतात पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे, सध्याच्या या स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया कमकुवत झाल्यामुळे भारताच्या आयात-निर्यातीवरही वाईट परिणाम झाला आहे.
आयात वस्तू महागल्या
डिसेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, भारताने रशियाकडून सुमारे 72.47 अब्ज रुपयांची आयात केली. रशिया भारताला प्रामुख्याने कच्चे तेल, खते, नैसर्गिक वायू आणि संरक्षण वस्तूंची निर्यात करतो. तसेच युक्रेनमधून भारत औषध बनवण्यासाठीचा कच्चा माल, सूर्यफूल, सेंद्रिय रसायने, प्लास्टिक, लोखंड आणि स्टील आयात करतो. त्यामुळे भारतीय बाजारातील या सर्व वस्तूंच्या किमतीवर विपरित परिणाम झाला आहे.