युक्रेनच्या अध्यक्षांचा दावा : युरोपीय सैन्य निर्माण करण्याची आवश्यकता
वृत्तसंस्था/ म्युनिच
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी युरोपीय देशांना उद्देशून एक संयुक्त सैन्य निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. म्युनिच सुरक्षा संमेलनाला संबोधित करताना झेलेंस्की यांनी युरोपीय देशांना यासंबंधी आवाहन केले आहे. अमेरिका, युरोपच्या मुद्द्यांना नाकारू शकतो आणि जर असे झाले तर युरोपच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण होणार आहे. रशिया आगामी काळात युरोपला लक्ष्य करण्याची तयारी करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याचा दावा झेलेंस्की यांनी केला आहे.
युरोपसाठी आता स्वत:चे सैन्य निर्माण करण्याची वेळ आली असल्याचा विश्वास आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास युरोपसाठी धोक्याच्या ठरणाऱ्या मुद्द्यांना अमेरिका नाकारू शकतो. युरोपला एकजूट अन् एक समान विदेश अन् संरक्षण धोरण तयार करण्याची गरज आहे. यामुळे युरोप स्वत:च्या सुरक्षेसाठी गंभीर असल्याचे अमेरिकेला कळू शकते. युरोपसाठी त्याला आवश्यक असलेले सर्वकाही आहे. केवळ त्याला एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, जेणेकरुन कुणीच त्याला नाही म्हणू शकणार नाही, त्याच्यावर स्वत:चे हुकूम सोडणार नाही तसेच युरोपला कुणीच सहजपणे हरवू शकणार नाही असे उद्गार झेलेंस्की यांनी संमेलनाला संबोधित करताना काढले आहेत.
रशियाच्या सैन्यदलात वाढ
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे सशस्त्र दलांमध्ये दीड लाख सैनिकांना सामील करत आहेत. रशियात दर आठवड्याला सैन्य भरती कार्यालय सुरू केले जात आहे. आमच्या गुप्तचर यंत्रणांकडे यंदाच्या उन्हाळ्यात रशिया प्रशिक्षण अभ्यासाच्या निमित्ताने बेलारुमध्ये सैन्य पाठविण्याची योजना आखत असल्याची ठोस माहिती आहे. हा प्रकार युरोपीय देशांच्या विरोधात मोहिमेची सुरुवात असू शकतो असा दावा झेलेंस्की यांनी केला. परंतु नाटोच्या सैन्य समितीचे अध्यक्ष अॅडमिरल ग्यूसेप कॅवो ड्रॅगन यांनी सध्या आमच्याकडे अशाप्रकारची ठोस माहिती नसल्याचे वक्तव्य केले.
पुतीन खोटारडे
पुतीन हे खोटारडे असून ते खऱ्या सुरक्षेची हमी देऊ शकत नाहीत. आमच्या भागीदारीशिवाय करण्यात आलेल्या वाटाघाटींना युक्रेन कधीच स्वीकारणार नाही. युक्रेनचे भविष्य नाटो संघटनेत आहे अशी टिप्पणी झेलेंस्की यांनी केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झेलेंस्की यांनी ही भूमिका मांडली आहे.









