अध्यक्ष ट्रंप यांच्याकडून वक्तव्य, प्रयत्नांना प्रारंभ, युक्रेनला हवी सुरक्षा हमी, मोठा शस्त्रपुरवठा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली असून आता रशिया आणि युव्रेन यांच्यात थेट चर्चा घडविण्याची योजना करण्यात येत आहे. या योजनेत ट्रंप महत्वाची भूमिका साकारत आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसमधून देण्यात आली आहे. या चर्चेत युक्रेनच्या सुरक्षेसंबंधीही बोलणी झाली. अमेरिकेने युक्रेनच्या सुरक्षेची हमी घ्यावी आणि युक्रेनने अमेरिकेकडून साडेआठ लाख कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे विकत घ्यावीत, असेही प्रस्ताव पुढे आले असून त्यांच्यावर विचार केला जात आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार दोन्ही नेत्यांमधील या महत्वपूर्ण चर्चेला सोमवारी रात्री अकरा वाजता प्रारंभ करण्यात आला होता. ती साधारणत: तीन तास चालली. चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले. मात्र, या चर्चेतून निश्चित तोडगा निष्पन्न झाला नाही. तरीही रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर उपाय शोधण्याची प्रक्रिया या चर्चेमुळे काही प्रमाणात पुढे गेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या चर्चेत युरोपातील अनेक देशांच्या प्रमुखांनीही भाग घेतला होता. चर्चेसंबधी एकंदर समाधान व्यक्त करण्यात आले.
शस्त्रसंधी नाही, तरीही…
आपण अध्यक्ष झाल्यानंतर एका दिवसात रशिया-युव्रेन युद्ध थांबवू असे आश्वासन ट्रंप यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारावेळी दिले होते. तथापि, आता अध्यक्ष झाल्यानंतर, ही समस्या आपल्याला वाटत होती, त्यापेक्षा जटील आणि गुंतागुंतीची आहे, याची जाणीव होत आहे, असे उद्गार त्यांनी काढल्याचे सांगण्यात येत आहे. 15 ऑगस्टला त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. नंतर त्यांनी झेलेन्स्की यांच्याशी बोलणी केली. मात्र, प्रत्यक्ष परिणामांच्या दृष्टीने या चर्चा यशस्वी ठरल्या नाहीत. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली नाही. मात्र, आपला हेतू केवळ शस्त्रसंधीचा नसून स्थायी शांतता कशी निर्माण होईल यासंबंधी आहे, असे नंतर ट्रंप यांनी स्पष्ट केले आहे.
युक्रेनला हवी सुरक्षा
रशिया केव्हाही युक्रेन आणि युरोपवर हल्ला करु शकतो. त्यामुळे युक्रेनला सुरक्षा पुरविण्याची हमी अमेरिकेने घ्यावी. युक्रेन अमेरिकेकडून 10,000 कोटी डॉलर्सची (साडेआठ लाख कोटी रुपये) शस्त्रे विकत घेण्यास तयार आहे, असेही प्रस्ताव चर्चेत समोर आले आहेत. अमेरिका त्यावर विचार करत आहे.
युक्रेनलाही त्याग करावा लागणार
रशियाने काही वर्षांपूर्वी जिंकलेला क्रिमियाचा प्रदेश युक्रेनला परत मिळणार नाही. तसेच युक्रेन ‘नाटो’ या महत्वपूर्ण संघटनेचा सदस्य कधीच होऊ शकणार नाही. सध्या होत असलेल्या युद्धात रशियाने ताब्यात घेतलेल्या डोनाबास प्रदेशावरही रशियाचे अधिपत्य युक्रेनला मान्य करावे लागेल, असे अमेरिकेने स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, यावर युरोपियन देशांची प्रतिक्रिया अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये रशिया-युव्रेन युद्धबंदी संबंधातील चित्र अधिक स्पष्ट होऊ शकेल, अशी स्थिती आहे.
दहा दिवसांमध्ये तोडगा निघणार ?
रशिया-युव्रेन युद्धावर येत्या 10 दिवसांमध्ये निश्चित तोडगा निघू शकेल, असे वक्तव्य झेलेन्स्की यांनी चर्चेनंतर केले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या समझोत्याविषयी येत्या एका आठवड्यात किंवा 10 दिवसांमध्ये निश्चित अशी काही उपाययोजना केली जाणार आहे, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये निश्चित निर्णय अपेक्षित आहे.
तोडगा दृष्टीपथात ?
ड युव्रेनच्या सुरक्षेची हमी मिळाल्यास युद्धावर तोडगा शक्य असल्याचे चित्र
ड ट्रंप यांच्याशी चर्चेत युरोपातील अनेक देशांच्या प्रमुखांचाही होता सहभाग
ड चर्चा सकारात्मक झाल्याचे दोन्ही बाजूंकडून स्पष्ट, काही काळात तोडगा
ड रशिया-युव्रेनच्या थेट चर्चेतून स्थायी तोगडा निघण्याची बळावली शक्यता









