पुतीन यांना देशाच्या भूमीचे रक्षण करणे ठरले अवघड : 76 हजार लोकांना करावे लागले स्थलांतर
वृत्तसंस्था/ कीव्ह/मॉस्को
रशिया आणि युक्रेन युद्धात रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसला आहे. युक्रेनचे सैन्य आता रशियात शिरून लढाई करत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाचे सैन्य रशियात दाखल होऊ शकले आहे. रशियाच्या कुर्स्क क्षेत्रात लढाई सुरू असल्याने पुतीन यांना मोठा झटका बसला आहे. पुतीन यांनी 76 हजारांहून अधिक कुर्स्क रहिवाशांना युद्धग्रस्त भाग रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. सुमारे 5 दिवसांच्या युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाच्या सीमावर्ती भागातील लोकांना स्थलांतर करणे भाग पाडले आहे.
युक्रेनचे सैन्य आतापर्यंत केवळ संरक्षणात्मक पावित्र्यात होती, परंतु युक्रेनच्या सैन्याने प्रतिआक्रमण सुरू करताच पुतीन यांचे सैन्य मागे हटू लागले आहे. रशियाच्या सीमावर्ती भागांमध्ये मोठ्या संख्येत स्थानिक लोकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे. रशियाचे अधिकारी 8 क्षेत्रांमध्ये तात्पुरती वास्तव्यसुविधा निर्माण करत आहेत. युक्रेनच्या या हल्ल्यामुळे पुतीन यांच्या डोकेदुखीत मोठी भर पडली आहे. युक्रेनचे हजारो सैनिक रशियात दाखल झाले असून त्यांनी सुमारे 11 गावांवर नियंत्रण मिळविले आहे. यादरम्यान युक्रेनच्या सैनिकांनी शेकडो रशियन सैनिकांना ठार केले आहे.
76 हजार लोकांचे स्थलांतर
कुर्स्क क्षेत्रातील सीमावर्ती भागांमध्ये लोकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. आतापर्यंत 76 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती रशियातील राजकीय नेते अर्टेम शारोव्ह यांनी दिली आहे. मागील काही दिवसांमध्ये वारंवार होणाऱ्या हल्ल्यांनंतर लोक बसेस, रेल्वे आणि कारद्वारे स्थलांतर करताना दिसून आले आहेत.
रशियाकडून सैनिक तैनात
पुतीन यांच्या सैन्याने आता युक्रेनच्या सैन्याला रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न चालविले आहेत. रशियाला युक्रेनवर कब्जा करण्यापेक्षा अधिक आता स्वत:ची भूमी परत मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रशियाने आता तीन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली आहे. रशियाकडून अनेक रॉकेट लाँचर, तोफा, रणगाडे आणि अवजड वाहनांना तेथे पाठविण्यात येत आहे. युक्रेनला आता रशियाच्या भूमीत पुढे सरकण्यापासून रोखल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
एक क्षेपणास्त्र, 14 ट्रक नष्ट
रशियाकडून सैनिकांना मोठ्या प्रमाणावर तैनात करूनही युक्रेनच्या सैन्याने अनेक मोठे झटके दिले आहेत. आक्रमण रोखण्यासाठी तैनात करण्यात येणाऱ्या रशियन सैनिकांच्या एका तुकडीला युक्रेनने संपविले आहे. सैनिकांनी भरलेल्या ट्रक्सवर एचआयएमएआरएस क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला होता. या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात 14 ट्रक्स जळून खाक झाले आहेत.









