अन्य दोन गावेही ताब्यात घेतल्याचा दावा
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनियन शहर झेर्झिस्क ताब्यात घेतल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये रशियन हल्ल्यांचे अनेक फुटेज दाखवले असून त्यामध्ये रशिया झेर्झिस्क शहर काबीज करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहे. झेर्झिस्क ताब्यात घेतल्याने आता रशियन सैन्याला कॉन्स्टँटिनोव्हका शहराकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या रशिया युक्रेन युद्धाला लवकरच 3 वर्षे पूर्ण होत आहेत. रशियन न्यूज आउटलेट आरटीनुसार, युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशात असलेले झेर्झिस्क हे शहर रशियाने ताब्यात घेतले आहे. झेर्झिस्क व्यतिरिक्त रशियाने ड्रुझबा आणि क्रिमस्कोये या दोन गावांवर नियंत्रण मिळवल्याचेही दिसून येत आहे.
युक्रेनने झेर्झिस्क शहराच्या रक्षणासाठी सुमारे 40,000 सैन्य तैनात केले होते. त्यापैकी 26,000 सैनिक 5 महिन्यांच्या लढाईत मृत्युमुखी पडले, असे रशियन सैन्याने म्हटले आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये रशियन ड्रोन युक्रेनियन रसद आणि सैन्याला लक्ष्य करताना दिसत आहे. युक्रेनियन सैन्याने शहरातील जवळजवळ प्रत्येक इमारतीला टार्गेट केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भागांचे रक्षण करण्यासाठी विविध तंत्रांचा अवलंब करण्यात आला.
रशिया-युक्रेनदरम्यानच्या तणावाला जवळपास तीन वर्षे पूर्ण होत असतानाच युद्धाच्या आघाडीवर अजूनही संघर्षाची परिस्थिती कायम आहे. तथापि, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलण्यास सहमती दर्शविली आहे. पुतिन यांच्याशी चर्चा हा युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग असेल तर आपला देश निश्चितच तो स्वीकारेल. पण संवादाच्या व्यासपीठावर मी पुतिनशी खूप निर्दयी वागेन, असे वक्तव्य अलिकडेच झेलेन्स्की यांनी केले होते.









