मॉस्को :
रशियाने शनिवारी युक्रेनवर पुन्हा प्रचंड हल्ला चढविला आहे. अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला. यामुळे युक्रेनमध्ये अनेक स्थानी मोठ्या आगी लागल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर युक्रेनने रशियाच्या तेलशुद्धीकरण केंद्रांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी रशियाने हा हल्ला केल्याचे रशियाच्या सामरिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचा हल्ला विनाशकारी होता, असे स्पष्ट केले आहे. रशियाने या हल्ल्यात 500 ड्रोन्स आणि 45 क्षेपणास्त्रांचा उपयोग केला. संपूर्ण युक्रेनमध्ये विविध 14 स्थानी हा हल्ला करण्यात आला. हे युद्ध थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न वेगाने होत असताना, दोन्ही देशांनी गेल्या 24 तासांमध्ये एकमेकांवर मोठे हल्ले केल्याने शांतता प्रक्रिया धोक्यात आली असल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ल्यांना उद्युक्त केल्याचा आरोप केला. रशियाच्या नव्या हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्हनजीकच्या रेल्वे स्थानकाचा नाश झाला. मात्र, सर्वाधिक हानी मध्य आणि अग्नेय युक्रेनमध्ये झाली. यामुळे युव्रेनच्या या प्रदेशांमध्ये तातडीच्या बचाव यंत्रणा आणण्यात आल्या असून नागरीकांचा जीव वाजविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमधला हा रशियाचा युक्रेनवरचा तिसरा मोठा हल्ला आहे.









