वृत्तसंस्था/ बीजिंग
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत देशांवर कर लादत असतानाच चीन आणि रशिया जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान चीनला जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा उत्पादक बनण्यास मदत करेल, अशी घोषणा रशियाने केली आहे. रशियाच्या सरकारी मालकीच्या अणुऊर्जा कंपनी रोसाटॉमचे प्रमुख अलेक्सी लिखाचेव्ह यांनी बीजिंगमधील चर्चेनंतर हे विधान केले. अमेरिकेकडे सध्या 94 अणुभट्ट्या असून त्यांची एकूण क्षमता सुमारे 97 गिगावॅट आहे. त्याचवेळी, चीन वेगाने नवीन अणुभट्ट्या बांधत आहे. एप्रिल 2024 पर्यंत त्याची क्षमता 53.2 गिगावॅटपर्यंत पोहोचली होती. आता 100 गिगावॅटपेक्षा जास्त क्षमता गाठून अमेरिकेला मागे टाकण्याचे चीनचे ध्येय आहे.
चीनकडे अणुऊर्जा विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अमेरिकेला मागे टाकण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले असून त्यात रशिया पूर्णपणे सहकार्य करणार आहे. रशियाने आतापर्यंत चीनमध्ये चार अणुभट्ट्या बांधल्या आहेत. तसेच आणखी चार अणुभट्ट्या बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे, रशिया आणि चीनची ही भागीदारी येत्या काळात अणुऊर्जा क्षेत्रातील जागतिक शक्ती संतुलन बदलू शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन, जिनपिंग आणि किम जोंग उन यांच्यावर कट रचल्याचा आरोप करत आगपाखड व्यक्त केली आहे. रशियाने या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.









