राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची किम जोंग यांनी घेतली भेट : रशियाकडून उपग्रह प्रक्षेपणात मदतीचे आश्वासन
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांची बुधवारी रशियन स्पेसपोर्ट वोस्तोचन कॉस्मोड्रोममध्ये भेट झाली आहे. हे स्पेसपोर्ट रशियाच्या पूर्व आमूर क्षेत्रात आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली आहे. तसेच पुतीन आणि किम जोंग उन यांच्यात वैयक्तिक स्तरावरही चर्चा झाली आहे. रशियाच्या साम्राज्यवादाच्या विरोधी लढाईत उत्तर कोरिया साथ देणार असल्याची घोषणा किम यांनी यावेळी केली आहे.
रशिया स्वत:चे सार्वभौमत्व आणि देशाच्या रक्षणासाठी युद्ध लढत आहे. आम्ही या लढाईत नेहमी रशियासोबत होतो आणि राहणार आहोत असे किम यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी किम यांनी अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण सुविधेचा आढावा घेतला आहे.
सैन्य सहकार्यावर चर्चा
दोन्ही नेत्यांदरम्यान सैन्य सहकार्यावर चर्चा झाली आहे, परंतु सध्या कुठल्याही करारावर स्वाक्षरी केली जाणार नाही. पाश्चिमात्य देशांचा विरोध असला तरीही आम्ही उत्तर कोरियासोबतचे संबंध मजबूत करणार आहोत. उत्तर कोरिया आमचा शेजारी असून त्याच्या हिताकरता आम्ही सातत्याने काम करत राहू असे उद्गार व्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी काढले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ अन् सुरक्षा परिषदेत रशिया उत्तर कोरियाच्या मुद्द्यावरून नेहमी ठाम राहिला आहे.

किम यांच्या भेटीचा आनंद
उत्तर कोरियाला उपग्रह प्रक्षेपणात मदत करण्याच्या उद्देशानेच आम्ही अंतराळ केंद्रात भेटलो. उत्तर कोरियाचे नेतृत्व रॉकेट निर्मिती तंत्रज्ञानात रुची दाखवत आहे. आमच्याकडे मोठा वेळ असल्याने आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करू. किम जोंग उन हे रशियाच्या दौऱ्यावर आल्याने आणि त्यांची भेट घेता आल्याने आनंद झाल्याचे वक्तव्य पुतीन यांनी केले आहे. किम जोंग हे मंगळवारी स्वत:च्या खासगी रेल्वेद्वारे व्लादिवोस्तोक शहरात पोहोचले होते. तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. किम यांच्यासोबत त्यांच्या भगिनी किम यो जोंग देखील रशियाच्या दौऱ्यावर आल्या आहेत. किम जोंग अन् पुतीन यांची यापूर्वी 2019 मध्ये भेट झाली होती.
रेल्वेने रशियात पोहोचले किम
किम जोंग उन हे मंगळवारी रेल्वेद्वारे रशियन शहर व्लादिवोस्तोकमध्ये पोहोचले होते. हे शहर रशिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेपासून सुमारे 127 मैल अंतरावर आहे. किम यांच्यासोबत उत्तर कोरियाचे वरिष्ठ सैन्याधिकारी देखील रशियाच्या दौऱ्यावर आहेत.
शस्त्रास्त्र करारावर अमेरिकेची नजर
पुतीन आणि किम जोंग उन यांची ही भेट दोन्ही देशांचे संबंध वृद्धींगत करणार असल्याचे क्रेमलिनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. याचदरम्यान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने किम अन् पुतीन यांच्या भेटीवर नजर असल्याचे नमूद पेल आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाला रशियासोबत कुठल्याही प्रकारचा शस्त्रास्त्रविक्री करार न करण्याचे आवाहन केले आहे.









