रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात दररोज 20 लाख बॅरेलपर्यंत : आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रशियाने मे महिन्यात भारत आणि चीनला एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी 80 टक्के निर्यात केली. म्हणजेच हे दोन देश आजही रशियाच्या स्वस्त कच्च्या तेलाचे सर्वात मोठे आयातदार असल्याचे दिसून येत आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (आयइए) च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात जवळपास शून्य होती जी आता 20 लाख बॅरल प्रतिदिन झाली आहे, तर चीनने आपली आयात प्रतिदिन 5 लाख बॅरलवरून 22 लाख बॅरल प्रतिदिन केली आहे. भारताची रशियन तेलाची आयात एप्रिलच्या तुलनेत 14 टक्के जास्तीची राहिली आहे आणि देशामध्ये रशियन कच्च्या तेलाच्या आयातीचा एक नवीन विक्रम नोंदला आहे.
भारत आणि चीनच्या आधी युरोप रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार होता. मात्र, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युरोपने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले. आता 90 टक्के पेक्षा जास्त रशियन तेल आशियामध्ये जाते. युद्धापूर्वी ते 34 टक्के होते.
भारत 60 टक्के कच्च्या तेलाची खरेदी अरब देशांकडून करत असे.रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे मार्च 2022 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचली.
त्यावेळी भारत 60 टक्के कच्च्या तेलाची खरेदी आखाती देशांकडून करत असे आणि केवळ 2 टक्के कच्चे तेल रशियाकडून खरेदी करायचा.भारत रशियाकडून कच्चे तेल घेतो आणि ते शुद्ध करतो, नंतर ते युरोपला विकतो.रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे युरोपीय देशांनी तेथून तेल घेणे बंद केले. त्यामुळे पाश्चात्य देश आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर देशांकडे वळले. याचा पुरेपूर फायदा भारताने घेतला.
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2022 नंतर युरोपीय देशांनी चीन आणि भारताकडून तेल खरेदीत प्रचंड वाढ केली आहे. एकूणच, या काळात सौदी अरेबियाने युरोपला विकले. त्यापेक्षा जास्त शुद्ध तेल भारताने युरोपला पाठवले. युद्ध सुरू होण्यापूर्वी युरोप भारताकडून दररोज 1.54 लाख बॅरल शुद्ध तेल खरेदी करत असे. युद्ध सुरू झाल्यानंतर हा आकडा 2 लाख बॅरल प्रतिदिन आणि मे 2023 मध्ये 3.60 लाख बॅरल प्रतिदिन झाला.









