संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार रशियाच्या हल्ल्यांमुळे 24 फेब्रुवारीपासून आतापर्यंत युक्रेनच्या 3,153 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर 3,316 जण जखमी झाले आहेत. तर ओडेशा शहरावर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका 14 वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला आहे. तर एक 17 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे.
डेन्मार्क आणि स्वीडन लवकरच स्वतःचा दूतावास युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये हलविणार आहेत. स्वीडिश दूतावास पुढील बुधवारपर्यंत कीव्हमध्ये पुन्हा कामकाज सुरू करण्याची योजना आखत आहे. तर अमेरिकेचा दूतावास देखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत कीव्हमध्ये परतू शकतो. रशियाच्या हल्ल्यांमुळे अनेक देशांनी कीव्हमधील स्वतःचा दूतावास बंद केला होता.
हंगेरीला युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याबद्दल पूर्वकल्पना होती असा दावा करण्यात येत आहे. पुतीन यांनी हल्ल्याच्या योजनेसंबंधी हंगेरीच्या अधिकाऱयांना कळविले होते असा दावा युक्रेनियन संरक्षण परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी केला आहे. तर दुसरीकडे जर्मनीने रशियाकडून आयात होणाऱया कच्च्या तेलाच्या विरोधात युरोपीय महासंघाकडून लादण्यात येणाऱया निर्बंधांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी युक्रेनला 37.5 कोटी डॉलर्सची सैन्य मदत पाठविण्याची घोषणा केली आहे. ब्रिटन युक्रेनला इलेक्ट्रॉनिक वॉर इक्विपमेंट आणि एक काउंटर बॅटरी रडार सिस्टीम पाठविणार आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघ आणि रेड क्रॉस यांच्या पाठिंब्याने मारियुपोलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य मंगळवारी देखील सुरूच होते.









