रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत युक्रेनमध्ये 213 मुलांनी जीव गमावला आहे. तर 389 मुले जखमी झाली आहेत. अनेक ठिकाणी बचावकार्य अद्याप सुरू असल्याने मृतांची संख्या आणखीन वाढू शकते असे विधान युक्रेनच्या लोकपालने केले आहे.मारियुपोलच्या डिफेन्स फोर्सने अजोवस्टल स्टील प्रकल्पात अडकलेल्या लोकांचा नवा व्हिडिओ जारी करत तेथील स्थिती जगासमोर मांडली आहे.
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनियन शहरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियाने 24 एप्रिल रोजी ईस्टरच्या दिनी पोल्टावामध्sय 5 क्षेपणास्त्रs डागून शहरातीला पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आहेत. तर दुसरीकडे रशियाचे सैन्य युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांचे मूळ शहर क्रीवी रिहवर हल्ला करण्याची तयारी करत आहे.
क्रिवी रिह शहराच्या डिफेन्स फोर्सचे प्रमुख ऑलेक्झेंडर विलकुली यांनी आगामी दिवसांमध्ये रशिया क्रिवीवर देखील हल्ला करू शकतो असे म्हणत आम्ही कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत असे विधान केले आहे.
खारकीव्हमध्ये रशियाला फटका
रशियाच्या सैनिकांनी खारकीव्हमधील हल्ले वाढविले आहेत, तरीही त्यांना पुढे सरकण्यास अपयश येत आहे. रशियाच्या सैन्याला स्वतःच्या कब्जातील भागांमधून देखील मागे हटावे लागले असल्याचा दावा युक्रेनच्या जनरल स्टाफने केला आहे. दुसरीकडे ओडेसावर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 10 जण जखमी झाले आहेत.
काळय़ा समुद्रात रशियाच्या युद्धनौका
काळय़ा समुद्रात अद्याप 24 हून अधिक रशियन युद्धनौका आणि पाणबुडय़ा तैनात आहेत. यामुळे युक्रेनवर सागरी मार्गाने हल्ला होण्याचा धोका कायम असल्याचे युक्रेनियन ऑपरेशन साउथ कमांडचे म्हणणे आहे. तर जपोरिजिया प्रकल्पाचे सीईओ ऑलेक्झेंडर मिरोनेंको यांनी एक महिन्यानंतर शहरातील स्टील प्रकल्प 50 टक्के क्षमतेसह पुन्हा उत्पादन सुरू करू शकतो अशी माहिती दिली आहे.









