आयपीएल साखळी फेरीत केकेआरने सनरायजर्स हैदराबादला 54 धावांनी नमवले
पुणे / वृत्तसंस्था
आंद्रे रसेलने फलंदाजीत 28 चेंडूत 49 धावा व गोलंदाजीत 22 धावात 3 बळी असे अष्टपैलू योगदान दिल्यानंतर केकेआरने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 54 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह केकेआरची प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची आशाअपेक्षा कायम राहिली आहे. गहुंजे स्टेडियमवरील या सामन्यात केकेआरने 6 बाद 177 धावा केल्या आणि सनरायजर्स हैदराबादला 8 बाद 123 धावांवर रोखत एकतर्फी विजय नोंदवला.
विजयासाठी 178 धावांचे कडवे आव्हान असताना हैदराबादतर्फे अभिषेक शर्मा (28 चेंडूत 43), एडन मॅरक्रम (25 चेंडूत 32), शशांक सिंग (11) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. अन्य सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद होत राहिले आणि यानंतर हैदराबादचा संघ विजयापासून कित्येक कोस दूर राहणार, हे स्पष्टच होते.
तत्पूर्वी, उमरान मलिकने भेदक मारा साकारत 3 बळी घेतल्यानंतरही आंद्रे रसेलच्या विस्फोटक फटकेबाजीमुळे केकेआरला निर्धारित 20 षटकात 6 बाद 177 धावांची मजल गाठता आली. आंद्रे रसेल (49) व सॅम बिलिंग्ज (29 चेंडूत 34) यांनी सहाव्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणले. त्यापूर्वी केकेआरची एकवेळ 5 बाद 94 अशी पडझड झाली होती.
केकेआरने शेवटच्या 5 षटकात 58 धावांची आतषबाजी केली आणि यात प्रामुख्याने रसेलच्या फटकेबाजीचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने ऑफ ब्रेक गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरच्या 3 फुलटॉसवर 3 षटकार खेचत खळबळ उडवून दिली. वॉशिंग्टन सुंदरला 4 षटकांमध्ये एकही बळी न घेता 40 धावा मोजाव्या लागल्या.
उमरान मलिकला केकेआरविरुद्ध लढतीपूर्वी झालेल्या 3 सामन्यातील 10 षटकात 120 च्या आसपास धावा मोजाव्या लागल्या आणि यामुळे त्याला सूर सापडत नसल्याचे स्पष्ट होते. मात्र, येथे त्याने 4 षटकात 33 धावात 3 फलंदाज गारद करत प्रतिस्पर्ध्यांना धक्के दिले. त्याने नितीश राणा (16 चेंडूत 26), अजिंक्य रहाणे (23 चेंडूत 28) व कर्णधार श्रेयस अय्यर (9 चेंडूत 15) यांना आपल्या पहिल्या 2 षटकाच्या स्पेलमध्ये बाद केले.
सातत्याने ब्लॅक होलमध्ये मारा करणाऱया टी. नटराजनची त्याला समयोचित साथ मिळाली. नटराजनने 43 धावा देत रिंकू सिंगला (5) बाद केले. वेंकटेश अय्यर हा मार्को जान्सनचा (4 षटकात 1-30) चेंडू यष्टीवर ओढवून घेत तंबूत परतला. रहाणेने 28 धावांच्या खेळीत 3 षटकार खेचले असले तरी आयपीएलसारख्या वेगवान खेळात तो बराच मागे पडत चालला असल्याचे या लढतीतही स्पष्ट झाले. स्वीपर कव्हरवर शशांक सिंगने अप्रतिम झेल टिपल्यानंतर रहाणेची खेळी संपुष्टात आली.
त्यानंतर रसेल व बिलिंग्ज यांच्या आतषबाजीला सुरुवात झाली आणि केकेआरला फारसे मागे वळून पहावे लागले नाही. रसेलने 3 चौकार व 4 षटकार फटकावले तर बिलिंग्जने देखील 3 चौकार व 1 षटकार वसूल केला.
संक्षिप्त धावफलक
केकेआर ः 20 षटकात 6 बाद 177 (आंद्रे रसेल 28 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 49, सॅम बिलिंग्ज 29 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 34, नितीश राणा 16 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 26, अजिंक्य रहाणे 24 चेंडूत 3 षटकारांसह 28. अवांतर 12. उमरान मलिक 4 षटकात 33 धावात 3 बळी, भुवनेश्वर, मार्को जान्सन, टी. नटराजन प्रत्येकी 1 बळी).
सनरायजर्स हैदराबाद ः 20 षटकात 8 बाद 123 (अभिषेक शर्मा 28 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 43, एडन मॅरक्रम 25 चेंडूत 3 षटकारांसह 32, शशांक सिंग 11. अवांतर 3. टीम साऊदी 4 षटकात 2-23, आंद्रे रसेल 3-22, उमेश यादव, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती प्रत्येकी 1 बळी).









