टी 20 वर्ल्डकपसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर : जेसन होल्डरचाही समावेश
वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आगामी टी 20 वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजने शनिवारी आपला संघ जाहीर केला. कर्णधारपदाची जबाबदारी रोव्हमन पॉवेल याच्या खांद्यावर सोपवली असून वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला उपकर्णधारपद देण्यात आले. निकोलस पूरन, आंद्रे रसेल आणि जेसन होल्डर या अनुभवी खेळाडूंचाही या संघात समावेश करण्यात आला असल्याची माहिती विंडीज क्रिकेट बोर्डाने दिली.
उदयोन्मुख वेगवान गोलंदाज शमार जोसेफने वेस्ट इंडिजच्या टी 20 विश्वचषक संघात स्थान मिळवले. याचबरोबर शिमरॉन हेटमायर संघात पुनरागमन झाले. तो गेल्या दोन महिन्यापासून टी 20 संघाचा भाग नव्हता. रोमारियो शेफर्ड, जॉन्सन चार्ल्स आणि शाय होप या तुफानी फलंदाजांनाही या संघात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, विस्फोटक फलंदाज कायल मेयर्सला संघात स्थान देण्यात आले नाही. दरम्यान, वर्ल्डकपसाठी क गटात विंडीज संघ असून या गटात न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी व युगांडा यांचा देखील समावेश आहे. विंडीजचा सलामीचा सामना दि. 2 जून रोजी युगांडाविरुद्ध होईल. विशेष म्हणजे, विंडीजने आतापर्यंत दोनदा टी 20 वर्ल्डकप जिंकला आहे. अर्थात, यंदा मायदेशात स्पधघ्& होत असल्याने त्यांच्या कामगिरीकडे चाहत्यांच्या नजरा असतील.
वर्ल्डकपसाठी विंडीजचा टी 20 संघ – रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, ब्रँडन किंग, शाय होप, निकोल्स पूरन, शेरफान रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), अकील हुसेन, गुडाकेश मोटिये, शमार जोसेफ. 
अमेरिकेचा टी 20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर, मोनांक पटेल कर्णधार
न्यूयॉर्क : 1 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेने शनिवारी आपला संघ जाहीर केला. प्रथमच वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या अमेरिकन संघात निम्मे खेळाडू भारतीय आहे. भारतीय वंशाच्या मोनांक पटेलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला कोरी अँडरसन यंदा अमेरिकन संघाचा सदस्य असणार आहे. याशिवाय, सौरभ नेत्रावळकर, नितीश कुमार, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलींद कुमार यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. टी 20 विश्वचषकाच्या ‘अ‘ गटात अमेरिका भारत, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा आहे. अमेरिकनसंघ 1 जून रोजी कॅनडाविरुद्ध पहिला सामना खेळेल. हा सामना डल्लास येथे होणार आहे. अमेरिकेचा संघ 12 जूनला न्यूयॉर्कमध्ये भारताशी भिडणार आहे.
वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघावर बक्षीसांचा वर्षाव
न्यूयॉर्क : अमेरिका व विंडीजमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम 5.6 मिलियन डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 46.77 कोटी रुपयांची बक्षीसे असणार आहेत. वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला 13.36 कोटी रुपये तर उपविजेत्याला 6.68 कोटी रुपये मिळणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे. याशिवाय, उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 3.32 कोटी रु. मिळणार आहेत.









