वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीला 18 मे पर्यंत कालावधीवाढ देण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या दूरध्वनी संभाषणानंतर हा कालावधीवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. 10 मे पासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी आहे. काही तुरळक अपवाद वगळता ती आजपर्यंत तरी पाकिस्तानकडून मोडण्यात आलेली नाही. तथापि, अद्यापही भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असून शस्त्रसंधीचा भंग पाकिस्तानकडून केव्हाही होऊ शकतो, अशी स्थिती आहे. परिणामी, भारतीय सैन्यदलांची सज्जताही कायम आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पुढे चालू ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये 10 मे या दिवशी प्रथम चर्चा झाली होती. त्याच दिवशी संध्याकाळी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. मात्र, 10 मे या दिवशी रात्री पुन्हा पाकिस्तानने सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार केल्याने भारतीय सैन्याने त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. हा अपवाद वगळता गेले पाच दिवस शस्त्रसंधी टिकून राहिल्याचे दिसत आहे.
दक्षता पातळी खाली आणणार
सीमेवर सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्यांना अतिदक्ष राहण्याचा इशारा दोन्ही देशांकडून देण्यात आला आहे. मात्र, आता ही दक्षता पातळी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या चर्चेत हा मुद्दाही उपस्थित झाल्याची माहिती देण्यात आली. तथापि, सध्याच्या परिस्थितीत भारताकडून सैन्याची दक्षता पातळी कमी केली जाण्याची शक्यता नाही. कारण पाकिस्तान त्याचा गैरफायदा घेऊ शकतो, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
भारताकडून शस्त्रसंधीचे नेहमीच पालन
आजवर अनेकवेळा भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या चार युद्धांच्या नंतरही प्रत्येकवेळी अशी शस्त्रसंधी करण्यात आली होती. तसेच आतापर्यंत किमान तीन वेळा दोन्ही देश युद्धाच्या सीमेपर्यंत पोहचले होते. त्यावेळीही शस्त्रसंधी घोषित करण्यात आली होती. तथापि, नेहमीच पाकिस्तानकडून तिचा भंग करण्यात आला आहे. भारताने एकदाही शस्त्रसंधीचा भंग केला नसून नेहमी पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे भारत याहीवेळी अत्यंत सावध पवित्र्यात आहे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला संधी द्यायची नाही, असा निर्धार भारताने केला असून त्यामुळे तिन्ही सेनादले सज्ज अवस्थेत ठेवण्यात आली आहेत.









