भारताच्या निर्यातबंदीचा परिणाम : शॉपिंग मॉलमध्ये ‘लूटमार’ : दरातही मोठी वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, कॅलिफोर्निया
रशियाने ब्लॅक सी डील रद्द केल्याचा फटका अनेक आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर झाल्याचे दिसून येत आहे. तसेच भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर हजारो किलोमीटर दूर अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांवर या निर्णयाचा परिणाम तातडीने दिसून आला. निर्यातबंदीची माहिती कळताच अमेरिकेतील भारतीय लोक धास्तावले असून त्यांनी तांदूळ साठवायला सुऊवात केली. शॉपिंग मॉलमध्ये तांदूळ खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय अनेक पोती तांदूळ विकत घेऊन घरी घेऊन जात आहेत. परिणामत: अमेरिकेत तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली असून खरेदीवर निर्बंधही लागू करण्यात आल्याचे समजते.
भारत सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केली आहे. बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यात धोरणावर निर्बंध घालण्यात आल्याचे विभागाचे म्हणणे आहे. तथापि, भारत या तांदूळ मालाच्या निर्यातीस काही अटींनुसार परवानगी देईल. सद्य:स्थितीत भारत सरकारने हा निर्णय रशियाने काळ्या समुद्रातील धान्य करार रद्द केल्यामुळे घेतल्याची चर्चा आहे.
‘डीजीएफटी’च्या अधिसूचनेनंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये घबराट पसरली आहे, परंतु अमेरिकेत परिस्थिती थोडी अधिक कठीण दिसत आहे. तांदळाची निर्यात थांबवल्यानंतर अमेरिकेतील भारतीयांनी तांदळाचा साठा करण्यासाठी मॉल्समध्ये धाव घेतली आहे. परिणामत: भारतीय सोना मसुरी तांदळाच्या किमती अमेरिकेतील दुकानांमध्ये अनेक पटींनी वाढल्या आहेत. अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय लोक निर्बंध उठेपर्यंत तांदळाच्या पोत्यांचा साठा करण्यासाठी स्टोअर्स आणि मॉल्सकडे आल्यानंतर अनेक दुकानांमध्ये ‘एक व्यक्ती, एक पोते’ हा नियम लागू करावा लागला. वाढत्या मागणीमुळे अनेक दुकानांमध्ये किमती 32 डॉलर्सवरून 47 डॉलर्सपर्यंत वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ही किंमत 22 डॉलर्स इतकी होती. अर्थातच तांदळाच्या किमती दुप्पट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
भारतातील प्रमुख तांदूळ उत्पादक भागात कमी पाऊस झाल्यामुळे गेल्या 10 दिवसात भावात 20 टक्क्मयांपर्यंत वाढ झाली आहे. एल निनोमुळे पुरवठ्याची चिंता वाढली आहे. याशिवाय भारताच्या निर्णयामुळे व्हिएतनाममधून येणारा तांदूळही महाग झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात अमेरिकेत तांदळाचे भाव दशकभरानंतर सर्वाधिक झाले आहेत. भारताने निर्यात मर्यादित केल्यास किमती आणखी वाढतील अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.









