पूजेच्या साहित्याबरोबर बेलपत्राची खरेदी : उपवासाच्या पदार्थांनाही मागणी
बेळगाव : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारात पूजेचे साहित्य आणि उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली होती. फळ-फुलांबरोबर केळी, साबू, वरी, शेंगदाणे, खजूर, राजगिरा लाडूंची खरेदी झाली. सायंकाळी गणपत गल्ली, मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी ग्राहकांची वर्दळ पाहावयास मिळाली. बुधवार दि. 26 रोजी महाशिवरात्री असल्याने शिवमंदिरात भक्तांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात फळा-फुलांबरोबर उपवासाच्या विविध पदार्थांना मागणी होती. अननस 60 ते 80 रु. एक, पेरू 100 रु. किलो, चिकू 140 रु. किलो, संत्री 80 ते 120 रु. किलो, द्राक्षे 100 ते 120 रु. किलो, सफरचंद 180 ते 250 रु. किलो, केळी 50 ते 60 रुपये डझन असा फळांचा दर आहे. त्याबरोबरच पूजेसाठी लागणाऱ्या पाच फळांची विक्री झाली. बाजारात विविध फुले, हार, बेलपत्री, कापूर, उदबत्ती आदी पूजेच्या साहित्याची रेलचेल पाहावयास मिळाली. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बाजारात हार, सुटी फुले आणि इतर साहित्याची खरेदी झाल्याचे दिसून आले.









