सोने-चांदी-इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी
बेळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयासाठी बाजारपेठेला झळाळी आली आहे. बुधवारी अक्षय्य तृतीया असल्याने सोने, चांदी, इलेक्ट्रिक वस्तू आणि घरकुल खरेदीला वेग आला आहे. शहरातील पोतदार ज्वेलर्स, चंदूकाका सराफ, जोयआलुकास, जोसआलुकास, मलाबार, आशीर्वाद, नवरत्न, डी. के. हेरेकर सराफ आदी दुकानांमध्ये वर्दळ वाढू लागली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, चांदी खरेदीवर भर दिला जातो. त्यामुळे शहरातील सराफी पेढीमध्ये नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढत आहे. विशेषत: ज्वेलरी दुकानांमध्ये चेन, ब्रेसलेट, नेकलेस, चांदी, तांब्याचे ताट आणि इतर खरेदीवर भर दिला जात आहे.
त्याचबरोबर इलेक्ट्रानिक शोरुममध्ये टीव्ही, वॉशिंग मशिन, मोबाईल, फ्रीज आणि इतर वस्तूंची खरेदी होऊ लागली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष ऑफर आणि सवलत ठेवण्यात आली आहे. यात्रा, जत्रा, लग्नसराई आणि त्यातच आता अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त अगदी तोंडावर आल्याने बाजारपेठेत खरेदीला उधाण येऊ लागले आहे. विशेषत: बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी गर्दी होऊ लागली आहे. याबरोबर नवीन घर आणि फ्लॅट बुकिंग केले जात आहेत. त्याचबरोबर नवीन वाहन खरेदीलाही पसंती दिली जात आहे. त्यामुळे शोरुममध्ये दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांचे बुकिंग केले जात आहे. बाजारपेठेत विविध फळांची आवक वाढली आहे. वाढत्या उष्म्यामुळे फळांना मागणी वाढू लागली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुर्हूतावर आंब्यांची आवक वाढली आहे. हापूस, तोतापुरी, मानकूर, पायरी, आदी आंबेही दाखल झाले आहेत.









