रविवारी दिवसभर भाऊ-बहिणींची गर्दी : विविध राख्यांची बहिणींना भुरळ
बेळगाव : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा प्रेम व आपुलकीचा सण आहे. शनिवार दि. 9 रोजी रक्षाबंधन असून बाजारपेठ विविध राख्यांनी सजली आहे. रविवारी शहर परिसरात राखी खरेदी करण्यासाठी बहिणींनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. तसेच राखी पौर्णिमेला आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी भाऊही खरेदीसाठी आल्याचे दिसून आले.
काही दिवसांपासून शहर व उपनगरांत पावसाने थैमान घातले होते. पण आता पावसाने उसंत घेतल्याने बाजारपेठा विविध प्रकारच्या राखींसह विविध वस्तूंनी फुलल्या आहेत. दरम्यान, रविवारी दिवसभर ऊन असल्याने महिलावर्गांनी राखीसह विविध खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. बाजारात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत विविध प्रकारच्या राखी विक्रीसाठी आल्या आहेत. विविध आकार, डिझाईन व रंग व थीम वापरून बनविलेल्या राख्या बहिणींना भुरळ घालत आहेत. बाहेरगावी असलेल्या आपल्या लाडक्या भावाला पाठविण्यासाठी व घरी राखी बांधण्यासाठी बहिणी बाजारपेठेत दाखल झाल्या होत्या.
बहिणींप्रमाणे भाऊही बहिणींना भेटवस्तू देण्यासाठी खरेदीला दिवसभर बाजारपेठेत फिरत होते. रविवारी दिवसभर ऊन असल्याचा फायदा घेत भाऊ-बहिणी बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाले होते. यामुळे बाजारपेठ ग्राहकांनी फुलल्याचे दिसून आले. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामुळे भाऊ-बहिणींकडून खरेदीला उधाण आले आहे.









