मागील चार दिवसांत हेस्कॉमच्या शहर विभागाकडे तब्बल 450 हून अधिक अर्ज दाखल
बेळगाव : गृहज्योती योजनेसाठी हयात असलेल्या व्यक्तींच्या नावे मीटर असणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच ग्राहकांचे मीटर मृत वडील, आजोबांच्या नावे असल्यामुळे त्यांना गृहज्योती योजनेसाठी नावनोंदणी करता येत नाही. त्यामुळे मीटरच्या नावामध्ये बदल करण्यासाठी मागील चार दिवसांत हेस्कॉमच्या शहर विभागाकडे तब्बल 450 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. राज्य सरकारने घोषित केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी गृहज्योती योजनेला रविवारपासून प्रारंभ झाला. 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा सरकारने केली असल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी बेळगाव वन तसेच हेस्कॉम कार्यालयात तुफान गर्दी होत आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्युत विभागाने काही निकष घालून दिले आहेत. यापैकी एकाही कागदपत्रामध्ये नावात बदल असेल तर नावनोंदणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी वीजमीटर मालकाच्या नावे असणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच जणांचे वीजमीटर हे त्यांच्या वडील अथवा आजोबांच्या नावाने आहेत. यातील अनेकजण मृत पावले असल्याने त्यांच्या मुलांच्या नावे मीटर असणे आवश्यक आहे. गृहज्योतीसाठी नावनोंदणी करताना ज्या व्यक्तींच्या नावे मीटर आहे, त्या व्यक्तीचा आधारक्रमांक द्यावा लागतो. परंतु मयत व्यक्तीची माहिती देणे अशक्य असल्यामुळे मीटरच्या नावात बदल करून घेण्यासाठी हेस्कॉम कार्यालयात गर्दी होत आहे. योजनेची घोषणा झाल्यापासून मीटरच्या नावामध्ये बदल करून घेण्यासाठी अर्ज दाखल होऊ लागले आहेत. केवळ मागील आठ दिवसांत हेस्कॉमच्या शहर विभागात 450 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक शहराच्या मध्यवर्ती भागातील उपविभाग 1 मध्ये अर्ज दाखल झाले आहेत. मीटरच्या नावात बदल झाल्यानंतरच त्या व्यक्तींना गृहज्योती योजनेसाठी नावनोंदणी करता येणार आहे.
नावात बदलासाठी अर्ज
गृहज्योती योजनेसाठी ज्या ग्राहकाच्या नावे मीटर आहे, त्या ग्राहकाचा आधारक्रमांक द्यावा लागतो. बऱ्याच ग्राहकांचे मीटर वडील अथवा आजोबांच्या नावे असून ते मयत झाल्याने नावनेंदणी होत नाही. त्यामुळे मीटरच्या नावात बदल करण्यासाठी दररोज अर्ज दाखल होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
– संजीव हमण्णावर (साहाय्यक कार्यकारी अभियंते हेस्कॉम)









