अर्ज दाखल करण्यासाठी महिलांच्या रांगा
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी बेळगाव वन कार्यालयात महिलांची तुडुंब गर्दी होऊ लागली आहे. सर्व्हरडाऊनमुळे महिलांना दिवसभर ताटकळत रांगेत थांबावे लागत आहे. सरकारने पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यापैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली आहे. गृहलक्ष्मी योजनेचा अर्ज दाखल करण्याची सुविधा बेळगाव वन, कर्नाटक वन, बापूजी सेवा केंद्रामध्ये करण्यात आली आहे. मात्र रिसालदार गल्ली येथील बेळगाव वनमध्येच गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढू लागला आहे. विशेषत: सर्व्हरडाऊन असल्यामुळे लाभार्थ्यांना दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. तर काही लाभार्थ्यांना गर्दी पाहूनच माघारी परतण्याची वेळ येत आहे.
जिल्ह्यात 14 लाख 70 हजार 742 इतकी शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत. या कुटुंबांना दरमहा दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. आयकर आणि जीएसटी रिटर्न स्वीकारणाऱ्यांना ही योजना लागू नाही. ग्रामीण भागात गृहलक्ष्मी योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी प्रजा प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आली आहे. तरीदेखील काही लाभार्थी बेळगाव वनमध्ये गर्दी करू लागले आहेत. अशोकनगर, रिसालदार गल्ली, गोवावेस, काकती, बसवन कुडची, हनुमाननगर, टी. व्ही. सेंटर आदी परिसरात बेळगाव वन कार्यालये आहेत. मात्र रिसालदार गल्ली येथील बेळगाव वन कार्यालयातच नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यातच सर्व्हरडाऊन असल्याने काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे काही नागरिकांना दिवसभर थांबूनदेखील अर्ज दाखल न करताच माघारी परतावे लागत आहे. गृहलक्ष्मी योजनेची रक्कम 16 ऑगस्टनंतर खात्यावर जमा केली जाणार आहे. मात्र अर्ज नोंदणीला प्रारंभ होताच लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. यामध्ये वयोवृद्ध महिलांचे हाल होऊ लागले आहेत.
प्रजा प्रतिनिधी घरोघरी फिरून अर्ज स्वीकारणार
ग्रामीण भागात गृहलक्ष्मी योजनेची जबाबदारी प्रजा प्रतिनिधी व अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे. प्रजा प्रतिनिधी घरोघरी फिरून अर्ज स्वीकारणार आहेत. लाभार्थ्यांनी बेळगाव वनमध्ये गर्दी करू नये.
– नागराज आर. (सहसंचालक महिला व बालकल्याण खाते)









