कार्यालयात होतेय गर्दी : नागरिकांची गैरसोय, हेलपाटे वाढले
बेळगाव : सरकारने जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. विशेषत: रेशनकार्ड आणि आधारकार्ड अपडेटसाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे काही नागरिकांना कामाविना माघारी परतावे लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत रेशनकार्ड अपडेटचे काम सुरू आहे. त्यामुळे गर्दी कायम आहे. शक्ती योजनेपाठोपाठ गृहज्योती आणि गृहलक्ष्मी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गृहज्योती योजनेचा शुभारंभ झाला आहे. त्यापाठोपाठ आता गृहलक्ष्मीचा शुभारंभदेखील येत्या 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. तत्पूर्वी अर्ज नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे. गृहलक्ष्मीचे 85 टक्के नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र काहींची कागदपत्रे व्यवस्थित नसल्याने नोंदणी करणे अडचणीचे होऊ लागले आहे. गृहलक्ष्मीच्या नोंदणीसाठी रेशनकार्ड सक्रिय असणे आवश्यक आहे. मात्र काही लाभार्थ्यांचे रेशनकार्ड बंद आहे. तर काहींनी ई-केवायसी केली नाही. त्यामुळे नोंदणीत अडचणी येऊ लागल्या आहेत.
गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र एपीएल कार्डधारकांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. विशेषत: एपीएल कार्डधारकांनी अन्नभाग्य योजनेचा लाभ घेतला नसल्याने शिधापत्रिका निष्क्रिय आहेत. त्यामुळे अर्ज करणे कठीण होऊ लागले आहे. अशा लाभार्थ्यांना प्रथमत: रेशनकार्ड सक्रिय करून घ्यावे लागत आहे. त्यानंतर अपडेट करून अर्ज दाखल करावा लागत आहे. बेळगाव वन, ग्रामवन, कर्नाटक वन, बापूजी सेवाकेंद्र व ग्रामीण भागात ग्राम पंचायतमध्येदेखील गृहलक्ष्मी योजनेचे अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज नोंदणीच्या लाभार्थ्यांची गर्दी ओसरू लागली आहे. मात्र अद्यापही नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. केवळ शासकीय कागदपत्रे रितसर नसल्यामुळे नोंदणीत अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा लाभार्थ्यांना धावपळ करावी लागत आहे.
अर्ज नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात
गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज नोंदणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यात बहुतांशी नोंदणी पूर्ण झाली आहे. मात्र काही ठिकाणी लाभार्थ्यांची कागदपत्रे व्यवस्थित नसल्याने नोंदणीत अडचणी येऊ लागल्या आहेत. नोंदणीसाठी येणाऱ्या लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत.
-नागराज आर. (सहसंचालक, महिला व बालकल्याण खाते)









