विधवा, दिव्यांग, वृद्धाप पेन्शन ठप्प : लाभार्थ्यांची परवड, प्रशासन सुस्त
बेळगाव : मागील दोन महिन्यांपासून वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांची मासिक पेन्शन ठप्प झाली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. मंगळवारी पेन्शन ठप्प झालेल्या लाभार्थ्यांनी चौकशीसाठी तहसीलदार कार्यालयात गर्दी केली होती. मात्र, लाभार्थ्यांना सुरळीत पेन्शन सुरू होईल, असे सांगून माघारी धाडले आहे. मात्र, दोन महिने पेन्शन नसल्याने जगावे कसे, असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांची पेन्शन सुरळीत करावी, अशी मागणीही होत आहे. विधवा, दिव्यांग व वृद्धांना आर्थिक पाठबळ मिळावे आणि जीवन सन्मानाने जगता यावे, यासाठी मासिक पेन्शन दिली जाते. मात्र, मागील दोन-तीन महिन्यांपासून पेन्शन ठप्प झाली आहे. पेन्शन का थांबविली आहे, असा प्रश्नही विचारला जात आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयातूनही समपर्क उत्तरे दिली जात नाहीत.
दैनंदिन गरजा भागवताना अडचणी
अचानक ही पेन्शन ठप्प केल्याने दैनंदिन गरजा भागवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: दिव्यांग आणि वयोवृद्धांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. आज पेन्शन होईल, उद्या पेन्शन होईल या आशेवर बसलेल्या लाभार्थ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
तहसीलदार कार्यालयात गर्दी
मासिक पेन्शन थांबविण्यात आल्याने याबाबत चौकशी करण्यासाठी दिव्यांग, वयोवृद्ध आणि विधवा महिलांनी मंगळवारी तहसीलदार कार्यालयात गर्दी केली होती. चौकशीसाठी आलेल्या लाभार्थ्यांना रांगेत थांबावे लागले होते. एकीकडे सरकारमार्फत सरकारी योजना तुमच्या दारी अशा घोषणा दिल्या जातात आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यांना मात्र पेन्शनपासून दूर ठेवले जाते. याबाबत लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे. आधीच महागाईने जनता हैराण झाली आहे, त्यातच वयोवृद्ध आणि दिव्यांगांची पेन्शन ठप्प झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पेन्शन तातडीने पूर्ववत करा
जानेवारी महिन्यापासून मिळणारी दिव्यांग पेन्शन ठप्प करण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन उदरनिर्वाह करणे त्रासदायक ठरू लागले आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात आणि बँकेतही कित्येकवेळा फेऱ्या मारल्या. मात्र पेन्शन का थांबली याबाबत समजले नाही. पेन्शन तातडीने पूर्ववत करावी.
– भागुबाई यळ्ळूरकर, लाभार्थी.









