भावी पिढी व्यसनाधीन होणे चिंतेची बाब : पालकवर्गाबरोबर गावातील युवक मंडळांनीही सतर्क राहण्याची गरज
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द परिसरासह ग्रामीण भागामध्ये गांजा विक्रीचा सुळसुळाट बेधडक वाढल्याने तरुणपिढी गांजा व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे पालकवर्गातून मोठ्या चिंतेची बाब तयार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर व्यसन फोफावत चालले असून पोलीस खात्यानेही यावर वेळीच आवर न घातल्यास सदर व्यसन देशाच्या भावी पिढीला धोक्याची घंटा ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया पालकवर्ग व सुजाण नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहे. पोलीस खात्याने ग्रामीण भागामध्ये गस्त वाढवून गांजा विक्री करून तरुण पिढीला बरबाद करणाऱ्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
दिवसाढवळ्या बेधडक गांजा विक्री
गांजा विक्री करणाऱ्या दलालांचे जाळे साऱ्या ग्रामीण भागामध्ये पसरले असून सदर दलाल एखाद्या जागेची निवड करून तेथ उभे राहतात. गांजा घेणारी व्यक्ती जाताच गांजाच्या पुड्या त्या दलालाकडून घेत असतात. तेंव्हा या ठिकाणी गांजा विक्री सुरू आहे, हे कोणालाही समजून येत नाही. इतक्या मोठ्याप्रमाणात गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू असतो. दारू व्यसनापेक्षा गांजा व्यसन महाभयंकर असल्यामुळे या व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण बाहेर पडणे मुश्किल होऊन बसते. यासाठी ग्रामीण भागामध्ये फोफावणाऱ्या या व्यसनाचा व गांजाविक्री करणाऱ्या दलालांचा पोलीस खात्याने वेळीच खबरदारी घेवून बिमोड करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया पालकवर्ग व नागरिकांतून उमटत आहेत.
अवैध कृत्यांमध्ये गुंतणे चिंताजनक बाब
गांजा सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनावर कोणताच ताबा राहत नसल्यामुळे तरुण पिढी अनेक अवैध कृत्यांमध्ये गुंतत असल्याचीही चिंताजनक बाब समोर येत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे तरुण पिढीला या व्यसनामध्ये गुंतून राहिल्यास त्यांच्या भावी आयुष्यात यशस्वी तरुण घडणाऱ्यांना चाप बसणार आहे.
ग्रामीण भागातील युवक मंडळांनी पुढाकार घेणे गरजेचे
आज ग्रामीण भागामध्ये विविध महापुरूषांच्या नावाने युवक मंडळांची स्थापना केलेली अनेक युवक मंडळे आहेत. सदर युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या मंडळांच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे गरजेचे असते. फक्त एखाद्या महापुरुषांच्या नावाने युवक मंडळाची स्थापना करून चालणार नाही तर त्या महापुरूषांना स्मरुन त्यांनी केलेल्या कार्याची आठवण करून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे हे युवक मंडळ कार्यकर्त्यांचे खरे काम असते. आज प्रत्येक गावामध्ये गांजाविक्रीबरोबर गावठी दारू विक्रीसह एखाद्या अन्यायग्रस्त व्यक्तींवर झालेल्या अन्याया विरोधात उभे राहून त्याला न्याय मिळवून देण्याची कामे जर युवक मंडळांच्या माध्यमातून होत गेली तर कोणत्याही गावामध्ये तरुण पिढीला व्यसनांच्या आहारामध्ये गुंतवून तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याच्या घटनांना आळा बसेल व असा कोणताही दलालसुद्धा गावामध्ये तयार होणार नाही.
पालकांचीही तेव्हढीच जबाबदारी
पालकांनीही आपली तरुण मुले काय करतात, यावर आपले लक्ष कटाक्षाणे ठेवणे गरजेचे आहे. आपला मुलगा कोणत्या मुलांची संगत करत आहे, चांगल्या की व्यसनाधीन. एखाद्या वेळेस व्यसनाधीन मुलांच्या संगतीत जात असल्यास त्याला वेळीच आवर घालणे गरजेचे असते. चांगल्या मुलांच्या संगतीत राहायला सांगणे हेही तितकेच गरजेचे असते. यासाठी पालकवर्गानेही आपल्या मुलांचे भावी आयुष्य सुजलम सुफलाम होण्यासाठी अगदी दक्ष राहिल्यासच वेगवेगळ्या व्यसनांचा बिमोड होणार आहे.









