जनसंपर्क खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांची माहिती
बेळगाव : नवीन वर्षात ग्रामीण भागातील पत्रकारांना बसपास देण्यात येईल. राज्य श्रमिक पत्रकार संघाने ग्रामीण भागातील पत्रकारांना बसपासची सोय करावी, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेण्यात आली असल्याची माहिती-जनसंपर्क खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी दिली. ग्रामीण पत्रकारांना बसपास देण्यासंबंधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून योजनेला गती देण्यात येईल. ग्रामीण पत्रकारांना बसपास देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी मागील अर्थसंकल्पावेळी घोषणा केली होती. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अनेकदा बैठका घेऊन चर्चा करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील पत्रकारांनाही बसपास योजनेचा लाभ मिळवून देण्याचा विचार असल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे.
अटी दूर करून सुलभपणे पास मिळवून द्या
बसपाससाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहेत. सेवासिंधू पोर्टलवर मोबाईल किंवा इंटरनेटद्वारे अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पत्रकारांनी माहिती खात्याकडे बसपाससाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित जिल्हा पातळीवर मोफत बसप्रवासासाठी जिल्हास्थळावरच बसपास वितरणाची व्यवस्था करणार आहे. ग्रामीण पत्रकारांसाठी बसपास मिळविण्यासाठी काही अटी असून त्या पत्रकारांना जाचक ठरत आहेत. त्यामुळे अटी दूर करून सुलभपणे पास मिळवून द्यावेत, अशी मागणी राज्य श्रमिक पत्रकार संघाने केली असून त्याचीही दखल घेतल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे.









