बेळगुंदी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात : उजवाड परिवार, बेळगुंदी मेडिकल्स-सेंट पॉल्स हायस्कूल प्रायोजक
बेळगाव : कसबेकर मेटगुड हॉस्पिटलतर्फे बेळगुंदी येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उजवाड परिवार, बेळगुंदी मेडिकल्स व सेंट पॉल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन सकाळी 9.30 ते दुपारी 2 पर्यंत करण्यात आले होते. यावेळी बोलताना कसबेकर मेटगुड हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बसवराज मेटगुड यांनी ग्रामीण भागातील नागरिकांमधील वाढत्या आजारांच्या निदानाचे महत्त्व विषद केले.
ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थ नियमित आरोग्य तपासणीपासून वंचित आहेत. यामुळे आजारांची संख्या अनेक पटींनी वाढत असून त्यामुळे बऱ्याचदा अचानक मृत्यूसुद्धा होत आहेत. यामुळे लोकांनी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. मेटगुड यांनी केले. ते पुढे म्हणाले की, शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित आरोग्य तपासणीचा लाभ मिळत नाही, याची मला चिंता वाटते. कारण अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले होते, असे डॉ. मेटगुड म्हणाले.
डॉ. बसवराज मेटगुड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ फिजिशियन डॉ. पी. एन. शांतगिरी, डॉ. प्रताप बुध्या, प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉ. केतकी भोसले, डॉ. पूर्वा बिरादार, नेत्रतज्ञ डॉ. उमेश हरकुनी यांच्यासह डॉ. प्रेरणा गोसावी, डॉ. गायत्री मुडपक्कगोळ, डॉ. मयुरी आदींच्या सहकार्याने आरोग्य तपासणी केली. बैलहोंगल सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉ. बसवराज मेटगुड यांचा सत्कार करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन डॉ. बसवराज मेटगुड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी बेळगुंदी ग्रा. पं. अध्यक्ष प्रताप सुतार, सेंट पॉल हायस्कूलचे प्राचार्य रमेश फर्नांडिस, पत्रकार लुईस रॉड्रिग्स आदींची उपस्थिती होती. फादर रमेश फर्नांडिस यांनी स्वागत केले.
हॉस्पिटलच्या संचालिका स्वरूपा मेटगुड, सेंट पॉल हायस्कूलचे व्यवस्थापक आणि पॅरिश प्रिस्ट फादर आग्नेलो फिगरेडो, सिस्टर डिकोस्टा, कसबेकर मेटगुड क्लिनिकचे जनरल मॅनेजर आनंद चिखली, वरिष्ठ अधिकारी राहुल देसाई, बेळगुंदी मेडिकल्सचे जोसेफ फर्नांडिस आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले. शिक्षिका माधुरी पाटील आणि शिक्षिका ग्रेसिला फर्नांडिस यांनी कार्यक्रमाचे संयोजन व शिबिराचे संचालन केले. सदर शिबिर यशस्वी होण्याकरिता सेंट पॉल्स हायस्कूलचे कर्मचारी व बेळगुंदी येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.









