येळ्ळूर, धामणे, सुळगे भागाला फटका : नवीन बसवले खांब
बेळगाव : वारा-पावसामुळे रविवारी रात्री बेळगाव तालुक्यातील वीजखांब कोसळले. यामुळे तालुक्याचा अर्धा भाग अंधारात होता. सोमवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. नवीन विद्युतखांब उभारून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु, यामुळे तब्बल पंधरा ते सोळा तास वीजपुरवठा ठप्प होता. रविवारी रात्री सोसाट्याचा वारा सुटला होता. काही ठिकाणी पावसामुळे वीजखांब कलंडले होते. वाऱ्यामुळे हे वीजखांब कोसळले. धामणे-येळ्ळूर रोडवरील मासगौंडहट्टी गावानजीक तीन विद्युतखांब कोसळून पडल्याने वीजपुरवठा बंद झाला. वडगाव येथील विद्युत स्टेशनमधून येळ्ळूर, देसूर यासह इतर परिसरात वीज वाहतूक करणारी मुख्य वाहिनीच बंद झाल्याने वीजपुरवठा ठप्प झाला. रात्री 9 वाजल्यापासून वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. सोमवारी सकाळपासून कोसळलेले विद्युतखांब हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी बाजूला केले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने नवीन विद्युतखांब बसवून वीजवाहिन्या ओढण्यात आल्या. दुपारी 3 पर्यंत दुरुस्तीचे काम सुरू असल्याने परिसरातील कुरबरहट्टी, येळ्ळूर, सुळगा, धामणे, यरमाळ, मासगौंडहट्टी, अवचारहट्टी, देवगणहट्टी यासह परिसरात वीजपुरवठा ठप्प होत आहे.
तीन खांब कोसळल्याने वीजपुरवठा ठप्प
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यातील काही भागात विद्युतखांब कोसळले. मासगौंडहट्टीनजीक तीन खांब कोसळल्याने वीजपुरवठा ठप्प झाला. सोमवारी सकाळी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
– दीपक धनपाल (साहाय्यक कार्यकारी अभियंता, बेळगाव ग्रामीण)









