वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय चलन गेल्या दोन वर्षांत जवळपास पाच टक्के आणि गेल्या पाच वर्षांत 20 टक्क्यांनी घसरले आहे, ज्यामुळे ते दक्षिण आणि आग्नेय आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक बनले आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात सतत घसरण दिसून आली आहे. रुपया अलिकडेच प्रति डॉलर 86.70 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. याबद्दल आर्थिक जगतातही बरीच चिंता असल्याचेही जागतिक रेटिंग एजन्सी मूडीज यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रुपया घसरण्याचा परिणाम समजून घेण्यासाठी मूडीजने भारतातील 23 कंपन्यांचे मूल्यांकन केले आहे. या आधारे, मूडीजला असे आढळून आले की यापैकी फक्त सहा कंपन्या डॉलरच्या मजबूतीमुळे प्रभावित आहेत. मूडीजच्या मूल्यांकनात समाविष्ट असलेल्या या कंपन्यांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल आणि एएनआय
टेक्नॉलॉजीज सामील आहे.
मूडीजने आशियातील उदयोन्मुख बाजारपेठांमधील कंपन्यांवरील त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत रुपयाचे अवमूल्यन फक्त पाच टक्क्यांनी झाले आहे, परंतु जानेवारी 2020 पासून ते 20 टक्क्यांहून अधिक घसरले आहे. अशाप्रकारे ते दक्षिण आणि आग्नेय आशियातील सर्वात कमकुवत कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक बनले आहे.









