फर्निचर, संरक्षक भिंतीचे काम प्रगतिपथावर
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डने विकासकामांना मंजुरी दिल्याने रस्ते व इतर विकासकामे सुरू आहेत. कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाला नवीन रूप देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. कार्यालयाच्या अंतर्गत भागात संरक्षक भिंत बांधण्यासाठीच्या कामाला सुरुवात झाली असून यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालय व शाळा यांना स्वतंत्र संरक्षक भिंत मिळणार आहे.
जानेवारी महिन्यात झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक बैठकीत विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. बोर्डमधील खराब झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणासोबतच अंतर्गत भागातील सुशोभिकरणास मंजुरी देण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयामध्ये संरक्षक भिंत बांधण्यासाठी 7 लाख 46 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. निधी मंजूर झाल्याने शनिवारपासून संरक्षक भिंत बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
बोर्डमधील शाळा व कार्यालय यामध्ये संरक्षक भिंत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच्या बैठकांमध्ये मांडण्यात आल्या होत्या. याची दखल घेत संरक्षक भिंत बांधण्याचा पर्याय मांडण्यात आला. या बांधकामाला निधी मंजूर करण्यात आल्याने संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
कार्यालयाला देणार नवीन लूक
कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यालय हे ब्रिटिश पद्धतीने बांधण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीव कुमार यांच्या कार्यालयाला नवीन लूक दिला जात आहे. या कार्यालयातील फर्निचरचे काम सुरू असून संपूर्ण कार्यालयाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.









