बायणा व खारवीवाडा किनाऱ्याला दिल्या भेटी, जाणून घेतल्या मच्छीमारांच्या समस्या
वास्को : वास्कोतील बायणा व खारवीवाडा भागातील मच्छीमार समुहाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचे आश्वासन मच्छीमार खात्याचे केंद्रीयमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी दिले आहे. स्थानिक मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी मुरगाव बंदर प्राधिकरण तसेच राज्य सरकारशी चर्चा करण्यात येत येईल असे केंद्रीयमंत्री रूपाला म्हणाले. पाचव्या सागर परीक्रमाअंतर्गंत शुक्रवारी केंद्रीय मच्छीमार खात्याचे मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी वास्कोतील मच्छीमार समुहाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बायणातील किनाऱ्यावर यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गोव्याचे मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर तसेच केंद्रीय मच्छीमार खात्याचे सचिव व राज्य मच्छीमार खात्याचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. वास्को खारवीवाडा येथील मच्छीमारी धक्क्यावर अखिल गोवा ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष व माजीमंत्री जुझे फिलीप डिसोजा यांनी केंद्रीय मंत्र्यांचे इतर सदस्यांसमवेत स्वागत केले. यावेळी त्यांनी केंद्रीयमंत्र्यांना खारवीवाडा मच्छीमारी जेटीच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. स्थानिक ट्रॉलर मालकांना सतावणाऱ्या समस्यांचीही त्यांना माहिती दिली व नव्या जेटीची आवश्यकता व्यक्त केली. ही जेटी चांगल्या पध्दतीने कार्यरत व्हावी व इतर समस्यांचीही सोडवणूक व्हावी यासाठी मुरगाव बंदर प्राधिकरण व राज्य सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी अखिल गोवा ट्रॉलर मालक संघटनेला दिले.
बायणातील कार्यक्रमातही विविध मच्छीमारी संघटना तसेच काही मच्छीमारांनी र्वयक्तीकरीत्या मच्छीमार समुहाच्या समस्या केंद्रीयमंत्री रूपाला यांच्यासमोर मांडल्या तसेच त्यांना निवेदनेही सादर केली. सर्वप्रथम मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी बायणातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत केंद्रीयमंत्र्यांना माहिती दिली. किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांचा प्रश्न, मच्छीमार व्यवसायासाठी किनाऱ्यावर नसलेल्या सुविधा व इतरांवर समस्या मांडल्या तसेच मुरगाव बंदर प्राधिकरणाकडून निर्माण होणार अडचणी त्यांनी व्यक्त केली. त्यावर केंद्रीयमंत्र्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. मच्छीमार नेते ओलान्सीयो सिमोईस यांनी किनाऱ्याची होणारी धुप आणि इतर समस्या मांडल्या. किस्तोद डिसोजा यांनी एमपीएचा विस्तार प्रकल्प रद्द करावा व खारवीवाडा किनाऱ्यावरील मच्छीमारांची पारंपरीक घरे वाचवावीत अशी मागणी केंद्रीयमंत्र्यांकडे केली. केंद्रीयमंत्री रूपाला यांनी यावेळी बोलताना देशातील मच्छीमार बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य भारतात प्रथमच मच्छीमार खाते निर्माण करून मच्छीमार समुहाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मच्छीमारांना भेटून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठीच पंतप्रधान मोदी यांच्या ईच्छेनुसार आपण विविध राज्यात फिरत आहे असे सांगून त्यांनी जाणुन घेतलेल्या मच्छीमारांच्या विविध समस्यांचा उल्लेख केला व या समस्या सोडवण्यासाठी आपण समस्यांच्या मुळापर्यंत जाईन असे आश्वासन दिले. मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी यावेळी बोलताना मच्छीमारांच्या समस्यांवर केंद्र राज्य सरकार योग्य उपाय काढतील असे आश्वासन दिले.









