माऊली जमदाडेने हॅपिसिंगवर एकचाक डावावर मिळविलला विजय, महाराष्ट्राच्या माऊलींनी गाजवले सावगावचे मैदान

बेळगाव : सावगांव येथील जय हनुमान कुस्तीगीर संघटना व परशराम पाटील (सावगांव) यांच्या स्मरणार्थ धुलिवंदनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या माऊली कोकाटेने पंजाबच्या रुपचंदचा अवघ्या 7 मिनिटात समोरची झोळी मारून आस्मान दाखविले तर महाराष्ट्राच्या माऊली जमदाडेने हॅपीसिंग पंजाबचा एकचाक डावावर 9 मिनीटात चित करून उपस्थित 20 हजारहून अधिक कुस्ती शौकीनांची मने जिंकली.
सायंकाळी 9.52 मिनिटांनी पहिल्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे व पंजाब चॅम्पियन रुपचंद पंजाब ही कुस्ती लोकमान्यचे सभासद गजानन धामणेकर, आर. एम. चौगुले, रामचंद्र मन्नोळकर, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, सुधीर चव्हाण, यल्लाप्पा बेळगावकर, कृष्णा हुंदरे, प्रकाश पाटील, उमेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला रुपचंद पंजाबने एकेरीपट काढून माऊली कोकाटेला खाली घेत घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला पण त्यातून माऊली कोकाटेने सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला माऊलीने एकेरीपट काढून रुपचंदवर ताबा मिळविला. यावेळी रुपचंद खालून डंकी मारण्याचा प्रयत्न करत असताना माऊली कोकाटेला समोरून झोळी बांधून रुपचंदला कळत नकळत आस्मान दाखविले.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती राशीवडेचे ज्येष्ठ कुस्ती समालोचक कृष्णा चैगुले, प्रकाश पाटील, आर. एम. चौगुले व सावगाव कुस्तीगीर संघटनेतर्फे महान भारत केसरी गंगावेस कोल्हापूरचा माऊली जमदाडे व पंजाबचा हॅपीसिंग यांच्यात लावण्यात आली. तिसऱ्या मिनिटाला हॅपीसिंगने दुहेरी पट काढून माऊलीवर कब्जा मिळविला पण माऊलीने त्यातून सुटका करून घेतली. पाचव्या मिनिटाला माऊलीने एकेरीपट काढून हॅपीसिंगला खाली घेत मानेवर घुटणा ठेवून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून हॅपीसिंगने सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत असताना माऊलीने एकचाक मारून चित करून उपस्थित 20 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूरचा मस्कर पाटील व यशवंत केसरी, पुण्याचा उदय खांडेकर यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीत चौथ्या मिनिटाला उदय खांडेकरने दोन्ही हाताचे हप्ते भरून मस्करला खाली घेतले. पण मस्करने सुटका करून घेतली. दहाव्या मिनिटाला उदय खांडेकरने पायाला आकडी लावून मस्करला खाली घेतले. मस्करला कळत न कळत बॅकथ्रो डावावर चित करून विजय मिळविला. चौथ्या क्रमाकांची कुस्ती संगमेश बिरादार व सतीश खरात कोल्हापूर ही कुस्ती डाव-प्रतिडावाने झुंजली. पण शेवटी संगमेशला विजयी घोषित करण्यात आले. पाचव्या क्रमाकांच्या कुस्तीत शिवय्या पुजारी मठपती आखाडा याने नातेपुतेच्या धुळा पांढरेवर घुटणा डावावर विजय मिळविला. ,सहाव्या क्रमाकांच्या कुस्तीत रोहित पाटील कंग्राळीने मारुती तोरणाळीचा घुटणा डावावर पराभव केला. सातव्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार कार्वे व प्रकाश इंगळगी ही कुस्ती वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. आठव्या कुस्तीत कामेश कोल्हापूरने पवन चिद्दीनकोप्पचा घुटणा डावावर पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रेम कंग्राळीने रोहित नातेपुतेचा एकलांगी डावावर विजय मिळविला. दहाव्या क्रमांकाची कुस्ती ओमकार सावगाव व आकाश निट्टूर ही रंगतदार कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. अकराव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुशांत कंग्राळीने दयानंद शिरगावचा डाक डावावर पराभव केलाला.
निखिल गणेशपूरने रवी पेंपण्णावरचा घुटणा डावावर पराभव केला. रोहित नितवे नातेपुते याने विनायक गुरवचा झोळी डावावर, संकल्प कंग्राळीने महादेव धऱ्याण्णावरचा डाक डावावर पराभव केला. त्याचप्रमाणे प्रविण निलजी, पंकज चापगाव, निरंजन येळ्ळूर, करण खादरवाडी, शुभम मुतगा, दुर्गेश संतिबस्तवाड, शुभम कारवे, अर्जुन स्पोर्ट्सहॉस्टेल, किरण मच्छे, लक्ष्मण मण्णीकेरी, ओमकार खादरवाडी, ऋतविक धुमणेवाडी यानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय मिळविला. आकर्षक गदेच्या कुस्तीत मंथन सांबराने कुणाल येळ्ळूरचा एकचाक डावावर पराभव करून कृष्णा सुतार यांनी ठेवलेल्या गदेचे बक्षीस पटकाविले. रोहन घेवडेने विकी करेचा झोळी डावावर, पार्थ क्रगांळीने सुमीत कडोलीचा घिस्सा डावावर, स्वप्नील सावगावाने दर्शन संतिबस्तवाडचा झोळी डावावर पराभव करून वाहव्वा मिळविली.
आखाड्याचे पंच म्हणून कृष्णा पाटील कंग्राळी, रुपेश कर्ले, संग्राम पोळ, बाळाराम पाटील, चेतन पाटील, नवीन मुतगे, सुमीत पाटील कंग्राळी, मालुप्पा येळ्ळूर, पिराजी मुचंडीकर, मारुती भोसले, राजू कडोली, प्रशांत पाटील कंग्राळी, कृष्णा पाटील कणबर्गी आदी पंचांनी काम पाहिले. कुस्ती समालोचन कृष्णा चौगुले यांनी केले तर कसबा सावगाव महाराष्ट्रच्या कृष्णा धुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी हालगी वादनाने कुस्ती शौकीनांना खिळवून ठेवले. यावेळी सुरेश पाटील खानापूर, नागेश मन्नोळकर, पुंडलिक पावशे, सुरेश डुकरे, सी. एम. पाटील, सतीशराम घाटेगस्ती, दत्ता पवार, मारुती कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









