बेळगाव : राज्य सरकारने घोषणा केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी ‘शक्ती मोफत बसप्रवास योजना’ रविवार दि. 11 पासून लागू करण्यात आली. आता गृहलक्ष्मी योजनेसाठी ऑनलाईन नावनोंदणी केली जाणार आहे. त्यापूर्वी आधार क्रमांकाला बँक खाते क्रमांक लिंक आहे की नाही, हे तपासण्यासाठी सीएससी केंद्रांवर गर्दी होत आहे. मात्र आधारकार्ड वेबसाईटचा आठ दिवसांपासून सर्व्हरडाऊन झाल्यामुळे इच्छुकांना निराश व्हावे लागले. काँग्रेस सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी व गृहज्योती, शक्ती यासह तरुणांसाठी युवानिधी व कुटुंबासाठी अन्नभाग्य योजना जाहीर केल्या आहेत. यातील काही योजना सरकारने सुरू केल्या असून काहींची अंमलबजावणी सुरू आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील एका महिलेच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 2 हजार रुपये जमा होणार आहेत. यासाठी सरकारने नियमावली तयार केली असून कर्नाटक वन (बेळगाव वन) केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. यासाठी आधार क्रमांकाला बँक खाते क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.
तासन्तास थांबण्याची वेळ
अनेकांना योजनेविषयी माहिती नसल्याने ते झेरॉक्स सेंटर, सीएससी सेंटरवर जाऊन आधारला बँक खाते लिंक आहे का? याची शहानिशा करीत आहेत. एकाच वेळी अनेक ग्राहक आधार वेबसाईट वापरत असल्यामुळे सर्व्हर डाऊनची समस्या येत आहे. हीच परिस्थिती सेवा सिंधूवरदेखील होताना दिसत आहे. त्यामुळे आलेल्या नागरिकांना तासन्तास थांबण्याची वेळ आली आहे.
अनावश्यक कागदपत्रांचे लचांड
सरकारकडून जाहीर केलेल्या योजनांविषयी नागरिकांना सविस्तर माहिती नसल्याचा गैरफायदा काही एजंट उचलत आहेत. ज्या कागदपत्रांची आवश्यकताच नाही अशा कागदपत्रांची मागणी करत आहेत. जेव्हा नागरिक ती आपल्याकडे नसल्याचे सांगतात तेव्हा ती कागदपत्रे काढून देण्यासाठी भरमसाट पैशांची मागणी केली जात आहे. गरज नसतानाही जात आणि उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट), चार फोटो यासह इतर कागदपत्रांचे लचांड महिलांच्या मागे लावले जात आहे.









