आंतरराष्ट्रीय सहभागाने झळाळणार लोकमान्य मॅरेथॉन
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व एनजीओ लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य मॅरेथॉन 2025 या बहुप्रतीक्षित उपक्रमाचे आयोजन 12 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता, आरपीडी कॉलेज ग्राउंड, बेळगाव येथे करण्यात आले आहे.लोकमान्य मॅरेथॉनमध्ये जपान आणि मलेशियासह इतर देशांतील धावपटूंचा सहभाग असणार आहे. विशेषत:भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेत जपान, मलेशिया येथून स्पर्धकांनी सहभाग घेतल्यामुळे या स्पर्धेला अधिक महत्त्व आले आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे कणकुंबी व चोर्ला या दाट जंगलातील दुर्गम भागातील 32 खेडी दत्तक घेतली आहेत. नियमितपणे शाळांना फळ्यांचे वितरण, शैक्षणिक साहित्य व स्वेटर यांसारखी आवश्यक शैक्षणिक साधने पुरविण्यात येतात. याशिवाय,आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न पेले जात आहेत. या मॅरेथॉनमधून मिळणारे उत्पन्न लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने दत्तक घेतलेल्या ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.









