वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची धावपटू निर्मला शेरॉनची गेल्या वर्षी घेण्यात आलेली चाचणी बंदी घातलेल्या पदार्थाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजकविरोधी एजन्सीच्या (नाडा) शिस्तपालन समितीने तिच्यावर आठ वर्षांची बंदी घातली आहे.
28 वर्षीय शेरॉनला 2018 मध्ये ‘डोपिंग’संदर्भातील उल्लंघनाबद्दल चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सदर बंदी पूर्ण करून भुवनेश्वरमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत ती परतली होती. ‘नाडा’च्या डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीने 27 डिसेंबर रोजी जारी केलेल्या आणि गुरुवारीच उघड करण्यात आलेल्या आदेशानुसार, शेरॉनवर 7 ऑगस्ट, 2023 पासून आठ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
‘नाडा’च्या वेबसाइटनुसार ‘अॅनाबेलिक अँड्रोजेनिक स्टेरॉईड्स’ आणि ‘टेस्टोस्टेरॉन’संदर्भात तिची चाचणी सकारात्मक आली आहे. तिथे फक्त तिचे पहिले नाव निर्मला नमूद केलेले आहे. एके काळी देशातील अव्वल क्वॉर्टरमिलर असलेल्या शेरॉनने भुवनेश्वर येथे 2017 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. परंतु 2018 मधील डोपिंगच्या प्रकरणामुळे तिचे ते सुवर्णपदक काढून घेण्यात आले होते. ती 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर शर्यतीत आणि 4×400 मीटर रिलेमध्ये देखील धावली होती.









