वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत रुमानियाच्या होल्गेर रुनेने मोनफिल्सचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्याच प्रमाणे महिला विभागात स्वायटेकने शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले.
फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने स्पेनच्या टॉपसिडेड कार्लोस अल्कारेझला पराभवाचा धक्का देत पुढील फेरी गाठली. 26 ऑगस्टपासून अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत असल्याने अल्कारेझला या पराभवाने विचलित केले आहे.
37 वर्षीय मोनफिल्सने अल्कारेझचा 4-6, 7-6(7-5), 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव केला. हा सामना पावसामुळे अनेकवेळा अर्धवट स्थितीत थांबवावा लागला होता. त्यानंतर शुक्रवारी या स्पर्धेत मोनफिल्सला रुमानीयाच्या 15 व्या मानांकित रुनेने 3-6, 6-3, 6-4 असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने मार्टा कोस्ट्युकचा 6-2, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. तृतिय मानांकित साबालेंकाने स्वीटोलिनावर 7-5, 6-2, अॅन्ड्रीव्हाने पाओलिनीचा 3-6, 6-3, 6-2, पॅव्हेलचेंकोव्हाने चीनच्या क्वीनवेनचा 7-5, 6-1 तर स्पेनच्या बेडोसाने पुतीनसेव्हाचा 6-4, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. इटलीच्या सिनेरला थॉमसनकडून पुढील फेरीसाठी चाल मिळाली.









