वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संघर्षादरम्यान माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाल्याची अफवा पसरल्याने वातावरण तापले आहे. या अफवेनंतर इस्लामाबादमधील पोलीस विभाग सतर्क झाला आहे. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून जाहीरसभांवर बंदी घालण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर इस्लामाबादमधील इम्रान खान यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संबंधित भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
इम्रान यांना पूर्ण सुरक्षा पुरविण्यात येईल. त्यांच्या सहकाऱयांकडून मदतीची अपेक्षा बाळगून आहोत असे इस्लामाबाद पोलिसांनी म्हटले आहे. इम्रान यांना काही झाल्यास याला पाकिस्तानवरील हल्ला मानले जाईल. अशाप्रकारच्या कृत्यामागे असलेल्या लोकांना पश्चाताप होईल असे प्रत्युत्तर देऊ असा इशारा इम्रान यांचे पुतणे हसन नियाजी यांनी दिला आहे.
देशातील सुरक्षा यंत्रणांनी इम्रान खान यांच्या हत्येच्या कटासंबंधी माहिती दिली होती असा दावा माजी माजी फवाद चौधरी यांनी केला आहे. इम्रान यांनी देशविरोधी कृत्याला नकार दिल्याने त्यांच्या हत्येसाठी एक कट रचण्यात आला असल्याचे विधान पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते फैसल वावडा यांनी केले आहे.
इम्रान यांनी देखील काही दिवसांपूर्वी स्वतःची हत्या होण्याची शक्यता वर्तविली होती. माझे जीवन संकटात आहे, पाकिस्तानातील आणि देशाबाहेरील काही लोक मला मारून टाकू पाहत आहेत असा दावा त्यांनी केला होता.