खानापूर : खानापूर-हल्याळ रस्त्यावरील राजा टाईल्स ते करबंळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर चार-पाच दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. झालेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. रुमेवाडी क्रॉस ते करंबळ क्रॉसपर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना या खड्ड्यांतून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्पुरती डागडुजी करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या 8 वर्षापूर्वीपासून बेळगाव-गोवा रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्यापासून या रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षापासून हा रस्ता कायम चर्चेत राहिला आहे. वेळोवेळी मोर्चे, आंदोलन करून रस्ता दुरुस्तीसाठी निवेदने देण्यात आली होती. मात्र हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत हात झटकले हेते. एकात्मक विकास योजनेखाली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी 14 कोटीचा निधी मंजूर केला आहे. मात्र अद्याप या रस्त्याचे बांधकाम सुरू नसल्याने यावर्षीही पावसाळ्यात प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे.
हा रस्ता केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केलेला आहे. आता या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून या रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नव्याने रस्त्याचे बांधकाम होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याने राजा टाईल्स ते करंबळ क्रॉस या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून तात्पुरता रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. रुमेवाडी क्रॉस ते करंबळ क्रॉसपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलेला आहे. या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.









