बी. वाय. विजयेंद्र यांचा हल्लाबोल तर काँग्रेसचा पलटवार : सरकारने हा खेळ त्वरित थांबवावा
बेळगाव : वक्फ बोर्डच्या मुदद्यावर शुक्रवारी काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तर वक्फमंत्री जमीर अहमद यांनी या नेत्यांना वेळोवेळी उत्तर देत वक्फ बोर्डच्या कृतीचे समर्थन केले. तर काँग्रेसच्या आमदारांनी या चर्चेत भाजपवर पलटवार केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी 8 सप्टेंबर 2024 रोजी विजापूर येथे झालेल्या वक्फ अदालतीचा उल्लेख करीत या अदालतीनंतरच संपूर्ण राज्यात वक्फ बोर्डची चर्चा सुरू झाली. मठ-मंदिरांना नोटीसा पाठविण्यात आल्या. केवळ मुस्लीम मतांवर आपण निवडून आलो आहे, या भ्रमात सरकार आहे, असा आरोप करीत नोटीसा त्वरित थांबविण्याची मागणी केली.
अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी पाठविलेल्या नोटीसांमुळे शेतकरी व गरीब रस्त्यावर आले आहेत. या समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने वक्फ कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी संयुक्त संसदीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. बिदर, विजापूर, गुलबर्गासह राज्यातील विविध जिल्ह्यात मठ मंदिरांच्या मालमत्तेवरही वक्फने हक्क सांगितला आहे. सरकारने हा खेळ त्वरित थांबवावा, अशी मागणी विजयेंद्र यांनी केली.
माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत वक्फ कायद्यात कसे बदल होत गेले, याची सविस्तर माहिती देत विजापुरातील परिस्थिती मांडली. पोलीस हेडक्वॉर्टर, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांचे निवासस्थान, सिव्हिल हॉस्पिटल इमारतीवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. मनगुळी, अगशी परिसरातील 16 एकर जमिनीत दलितांची वस्ती आहे. या वस्तीवरही वक्फने आपले नाव चढवले आहे. रायचूरमध्ये वाल्मिकी भवनच्या वर प्रार्थनास्थळ बांधण्यात आले होते. नागरिकांनी ते पाडले. याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
बाराव्या शतकातील क्रांतीकारी संत महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंटपाच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. प्रत्यक्षात बिदर जिल्ह्यातील बसवकल्याणमध्ये जिथे अनुभव मंटप होता, ती इमारत आज पीरबाशा दर्ग्यामध्ये परिवर्तित झाली आहे. तुम्हाला अनुभव मंटपाची काळजी असेल तर त्वरित दर्गा हटवून ही इमारत अनुभव मंटपासाठी उपलब्ध करून द्यावी. वक्फ कायद्यामुळे देश सुरक्षित नाही. मुस्लीम शेतकरीही सुरक्षित नाहीत, असे सांगत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
आमदार रिजवान अर्शद यांचा पलटवार
काँग्रेसचे आमदार रिजवान अर्शद यांनी वक्फच्या मुद्द्यावर भाजपवर पलटवार केला. भाजप सत्तेवर असताना कुमार बंगारप्पा समितीने 4 हजार एकर अतिक्रमित जमिनी वक्फने ताब्यात घ्यायला हव्यात, अशी शिफारस केली होती. आपल्या जाहीरनाम्यातही भाजपने वक्फ जमिनीच्या संरक्षणाचे आश्वासन दिले होते. कर्नाटकात भाजप वक्फच्या बाजूने होता. आता का उलटला? हे कळत नाही. भाजप सत्तेवर असतानाही वक्फ बोर्डकडून नोटीसा दिल्या आहेत. केवळ राजकारणासाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला.









