पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा : समाज माध्यमांवर असणार विशेष लक्ष
बेळगाव : गणेशोत्सव उत्साहात व शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस दलाने सर्व तयारी पूर्ण केली असून उत्सवाच्या काळात समाजमाध्यमांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. सामाजिक शांततेला सुरुंग लावणारे संदेश पसरविणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून कायद्याचा हिसका दाखविण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिला आहे. याबरोबरच डीजेला परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त कार्यालयात शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना गणेशोत्सवाच्या तयारीची माहिती दिली.
बेळगाव शहर व तालुक्यात 1 हजार 135 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी 1 हजार गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित 135 मंडळांना परवानगी देण्याचे काम सुरू आहे. नियम व अटींवर आगमन सोहळ्यालाही परवानगी देण्यात आली आहे. 23 ऑगस्टपासून 26 ऑगस्टपर्यंत यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आगमन सोहळ्याचा मार्ग व वेळ स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठरवायचा आहे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. उत्सवाच्या काळात वाहने उभी करण्यासाठी काही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
लवकरच ते नागरिकांना कळविण्यात येणार आहे. समाजमाध्यम व फ्लेक्सच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर व पोस्ट टाकणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. या काळात हॉटेल व इतर खाद्यपदार्थांची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ध्वनिक्षेपकाच्या वापरावर काही निर्बंध असणार आहेत. रात्री 10 वाजेपर्यंतच यासाठी परवानगी असणार आहे. त्यानंतर ध्वनिक्षेपक बंद करावे लागणार आहे. जर कोणी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावले तर ज्यांना त्रास होतोय त्यांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले.
रात्री उशिरापर्यंत बससेवा
गणेशोत्सवाच्या काळात रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी अडथळे होऊ नयेत, याची आयोजकांनी काळजी घ्यावी. मंडप उभारताना वाहनांसाठी पुरेशी जागा सोडावी, अशी सूचना करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या काळात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी प्रत्येक मंडळाने आपल्या पाच स्वयंसेवकांची नावे द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. उत्सव काळात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांना अनुकूल व्हावे यासाठी रात्री उशिरापर्यंत बससेवा सुरू ठेवण्यासाठी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
शेवटच्या दिवशी फटाक्यांवर बंदी
श्री विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरात गणेशभक्तांची मोठी गर्दी असते. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखे प्रकार टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी फटाक्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. रात्री 12 वाजता चन्नम्मा सर्कलहून काकतीवेसकडे येणारा रस्ता अडवून या मार्गावरून येणाऱ्या श्रीमूर्ती कॉलेज रोडमार्गे वळविण्यात येणार आहेत. मध्यरात्री 2 वाजता पोतदार ज्वेलर्सजवळ गणपत गल्लीचा रस्ता अडवून खडेबाजारमार्गे वळविण्यात येणार आहे. पहाटे 4 वाजता हुतात्मा चौक, रामदेव गल्लीचा प्रवेशही बंद करून किर्लोस्कर रोडमार्गे मिरवणूक वळविण्यात येणार आहे. जनरेटर व साऊंड सिस्टीम नेणारी वाहने श्रीमूर्ती घेऊन जाणारी वाहने हेमू कलानी चौक, शनिमंदिर, बँक ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी उद्यान, मराठा मंदिर क्रॉसजवळ आल्यानंतर वेगवेगळी करावीत. उत्सवाच्या काळात मद्यपान व अमलीपदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या वेळी एखाद्या मंडळाला पुढे जायचे असेल तर इतर मंडळांनी त्यांना वाट करून द्यावी, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले.









