अध्याय एकोणीसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, अहिंसा, सत्य, चोरी न करणे आसक्ती नसणे, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय हे ‘यम’ होत. त्यापैकी स्थिरतेपर्यंत मी तुला सविस्तर सांगितले आता पुढील वर्णन ऐक. आपल्या देहाला कोणी वंदन करो किंवा मारो, तरी दोन्ही वेळा क्षमा सारखीच. देहाचा भोग हा दैवावर अवलंबून आहे. असा विचार करून तो नेहमी क्षमाशीलच असतो. ह्याचंच नाव ‘क्षमा’.
आता प्रत्येक गोष्टीतील भीती कशी नष्ट करायची ते सांगतो सर्वत्र एकच ईश्वर भरून राहिला आहे हे लक्षात घेऊन जे जे दिसते ते ते ईश्वरी रूपच समजावे. आत्मा एक आणि पंचमहाभूतेही एक. पाहावयास गेले तर दुसरे काहीच नाही. हे प्रत्ययाला आले की भय संपलेच म्हणायचे. ह्याचेच नांव निखालस ‘अभय’ दुजेपणाच्या गोष्टीच नाहीशा झाल्या, म्हणजे जगामध्ये औषधालासुद्धा भय मिळावयाचे नाही. ह्याप्रमाणे आत्मदृष्टी लाभली की, अभयाच्या आनंदाची पुष्टि होत राहते. याप्रमाणे बारा यम कोणते ते तुला सांगितले. आतां ‘नियम’ असे ज्याला म्हणतात त्याचेही लक्षण सुलभ रीतीने सांगतो ऐक. अंतःशुद्धी, बहिःशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथिसेवा, माझे पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरूसेवा, हे ‘नियम’ होत.
‘शौचाचा’ म्हणजे स्वच्छतेचा प्रकार सांगतो. विचाराने अंतःकरणाची शुद्धी करावी आणि बाह्य ‘शौच’ म्हणजे वेदाज्ञेप्रमाणे मृत्तिका व जल यांनी शरीरशुद्धी करावी.
आता ‘जपाचा’ विचार ऐक, ज्याला जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याने मंत्राचा जप करावा किंवा स्वतंत्र गुरूचे नाम किंवा गुरूने दिलेला नाममंत्र जपावा. ‘वेदघोष’ करणे हा ब्राह्मणाचा जप होय व ‘ओंकार’ हा संन्याशाचा जप होय, नाममंत्र हा तर सर्वांनाच लागू आहे.
आता ज्याच्या योगाने अंतःकरणाची शुद्धी होते, तो ‘तपाचा’ मुख्य प्रकार होय. ज्याने त्याने आपापल्या धर्माचे प्रेमादराने आचरण करावे. शरीरशोषणाला ‘तप’ म्हणणे हा मूर्खपणा होय. हृदयामध्ये सत्स्वरूप श्रीहरीचे चिंतन करणे हेच सर्वात ‘श्रे÷ तप’ होय. आता होमाचा विचार ऐक. अग्नि हे देवाचे मुख आहे. यासाठी पंचमहायज्ञ, अग्निहोत्र इत्यादि करणे यास ‘होम’ असे म्हणतात. उद्धवा ! माझ्या भजनाची अत्यंत आवड असणे किंवा धर्माची अतिशय गोडी असणे, हीच मूर्तिमंत ‘श्रद्धा’ होय.
जो मनुष्य अन्न किंवा धन जवळ नसले तरी दीनदुबळय़ांचे चरण शिरसावंद्य करून मधुर भाषणाने त्यांचा गौरव करतो, त्यांना तृप्त करून सोडतो. हेच ‘आतिथ्य’ होय. अंतःकरणाच्या खऱया कळवळय़ाने, आवडीने लोकांना एकत्र करून मोठय़ा समारंभाने माझी म्हणजे भगवंताची यथासांग पूजा करणे किंवा ब्राह्मणांचा समुदाय मिळवून, त्यांची श्रद्धेने षोडशोपचार पूजा करणे, असे केले की, मला श्रीहरीला संतोष होतो. तसेच अंतःकरण शुद्ध होण्याकरिता तीर्थाला जात असावे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी श्रद्धा धरणे याचंच नाव ‘तीर्थाटन’ होय. पावलोपावली माझ्या नामाची गर्जना करून माझे गुणलीलानुवाद करीत निरिच्छपणाने यात्रा करणे हीच श्रे÷ ‘तीर्थयात्रा’ होय.
पर्वत ज्याप्रमाणे केवळ परोपकाराकरिताच खनिज पदार्थ व वनस्पतींचा भार वाहतात, त्याप्रमाणे केवळ परोपकारार्थ निरंतर कर्मे करून सर्वकाळ उपकार करीत राहावे. चंद्राचे किरण ज्याच्यावर पडतात त्याला शितलतेचा अनुभव येतो, त्याप्रमाणे उपकारानेच जनाला सुखी करून
सोडावे.
दैवाने जे काय प्राप्त होईल, तेवढय़ावरच मोठय़ा संतोषाने काळ व्यतीत करावा म्हणजे पोटामध्ये समविषमभाव उठत नाही. यालाच ‘यदृच्छालाभ संतुष्ट’ म्हणजे मिळेल त्यांत संतुष्ट रहाणे असे म्हणतात. काया, वाचा, मन व धन गुरुला अर्पण करून गुरुला जो शरण जातो, त्याच्या संसाराचे धरणे उठते. याचंच नाव ‘गुरुसेवा’. शौचाचे दोन गुण आणि जप आदिकरून दुसरी दशलक्षणे मिळून हे बारा ‘नेम’ होत.
क्रमशः







