पहलगाम हल्ल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कायम राहिल्याने भारतीय सेनेने आता अधिकच आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. खरे तर लष्कराने या कारवाईत केवळ पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या वेळी नागरी वस्ती किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही केंद्राला धक्का न लावण्याची खबरदारी भारताने घेतली. परंतु, तरीही सीमेवर कुरापती काढून पाकने सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट केल्याने भारताने पुढचे पाऊल उचलले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर 2’ हा त्याचाच भाग म्हणता येईल. सध्या पाकिस्तानविरोधात भारतीय सेनेने जोरदार आघाडी उघडली असल्याची माहिती समोर येत आहे. जल, जमीन आणि हवाई अशा तिन्ही माध्यमातून पाकवर हल्लाबोल केला जात आहे. अगदी पेशावर, लाहोर, कराची बंदरापासून ते पार राजधानी इस्लामाबादपर्यंत सगळ्या बाजूने भारतीयांनी पाकची कोंडी केली असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयचे उपद्रवमूल्य नवे नाही. तथापि, भारतीय सेनेच्या तडाख्यातून आयएसआयच्या मुख्यालयाचा परिसरही सुटत नसेल, तर त्यातून हा अॅटॅक कसा आहे, याची कल्पना यावी. सागरी मार्गाने कराची बंदरावरही हल्लाबोल करण्यात आल्याचे बोलले जाते. कराची बंदर हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत मानला जातो. भारतीय नौदलाने त्यालाच टार्गेट केल्याने पाकच्या तोंडचे पाणी पळाले असणार, हे वेगळे सांगायला नको. इस्लामाबाद ही तर पाकची राजधानी. संसद भवन, सुप्रिम कोर्ट, राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालय अशी महत्त्वाची सरकारी केंद्रे तिथे दिसतात. वाघा बॉर्डरपासून 250 किमी अंतरावर असलेल्या या राजधानीवर हल्ला चढवून भारताने पाकच्या वर्मी घाव घातला, असेही म्हणतात. अर्थात अधिकृत पत्रकार परिषदेत असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही. मुख्य म्हणजे पाकने भारतावर केलेले ड्रोन अन् मिसाईलचे हल्ले भारताच्या अत्याधुनिक यंत्रणांकडून पोकळ ठरविण्यात आले आहेत. भारतीय हद्दीत जवळपास 36 ठिकाणी केलेले 400 ड्रोन हल्ले परतवून लावल्याचे परराष्ट्र खात्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. भारताच्या भक्कम बचावाचाच हा नमुना म्हणता येईल. दिवाळखोरीशी सामना करावा लागत असतानाही मागच्या काही वर्षांत पाकने संरक्षण विभागासाठी प्रचंड खर्च केला आहे. परंतु, हा सगळा फुसका बार निघावा, यातच सर्व आले. हा देश असा भारताच्या कचाट्यात सापडलेला असतानाच पाकच्या अंतर्गत शत्रूंनी संधी साधावी, हे पाकच्या कर्माचेच फळ ठरावे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी तशी जुनीच. तथापि, मागच्या काही वर्षांत बलूच आर्मीने जोरदार उचल खाल्ल्याचे दिसते. मध्यंतरी रेल्वेगाडी लांबवून बलूच अतिरेक्यांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला होता. मागच्या दोन-पाच दिवसांतही पाकविरोधात बलूच चांगलेच आक्रमक झाले आहेत. या बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाकचे 18 सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात येते. बलूच लिबरेशन आर्मीने रिमोटच्या साह्याने पाकिस्तानच्या लष्कराची गाडीच उडवून लावल्याने पाकच्या सुरक्षाव्यवस्थेच्या चिंधड्या उडवल्या गेल्या आहेत. आता तर मोठ्या भूभागावर ताबा केल्याचा दावा या संघटनेकडून करण्यात येत आहे. पाकसाठी ही धोक्याची घंटा ठरावी. वास्तविक, पाकिस्तानला सर्वांत मोठा प्रांत ही बलुचिस्तानची ओळख. या प्रांताने देशाचा 40 ते 45 टक्के भूभाग व्यापला आहे. 1947 मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली. परंतु, बलुचिंना पाकिस्तानात सामील होणे मान्य नव्हते, असे इतिहास सांगतो. मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या बॅ. जिनांच्या तत्त्वांशी बलूच मंडळी सहमत नव्हती. आम्ही मुस्लिम असलो, तरी आमची संस्कृती वेगळी आहे. बलुचि समाजाचे नेते खान साहेब कराचीत असताना बॅ. जिना यांनी त्यांना जबरदस्तीने विलिनीकरणाच्या करारनाम्यावर सही करायला भाग पाडले, असा दावा बलुचिंकडून केला जातो. सांप्रत स्थितीतही आम्हाला धर्मांध राष्ट्र नको. गन नको, पेन हवे. नव्या राष्ट्रात सर्वांना समान संधी असेल. स्त्रियांनाही समान हक्क मिळतील, अशी मांडणी बलूच मंडळींकडून केली जात आहे. धर्मवादाने पाकचा कसा नाश झाला, याचे उदाहरण जगासमोर आहे. हे पाहता पाकचाच भाग असलेल्या बलुचिस्तानातून हा सूर उमटावा, यातूनच काय तो बोध होतो. म्हणूनच पुढच्या टप्प्यात बलुचिस्तान वेगळे राष्ट्र म्हणून उदयास आले, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. याशिवाय पाकमधून पश्तुनिस्तान व बलवारीस्तानची मागणीही ऐरणीवर आलेली पहायला मिळते. त्यामुळे पाकिस्तानचे आणखी तीन तुकडे होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. पाकविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजनैतिक पातळीवरही जगभरात पाकची कोंडी करण्यात मोदी यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भारत माघार घेईल, असे वाटत नाही. पाकिस्तानचा आजवरचा इतिहास हा धर्मांधारितच राहिला आहे. खरे तर केवळ समान धर्मामुळे राष्ट्र टिकत नाही, हे बांग्लादेश निर्मितीतून स्पष्टपणे अधोरेखित झाले. पण, त्यातून पाकिस्तानने धडा घेतला नाही. उलट दहशतवाद्यांना हाताशी घेत धर्माचे विष पेरण्यातच पाकिस्तानने धन्यता मानली. त्यातून त्या देशाचे जे नुकसान झाले, ते अपरिमितच म्हणता येईल. शिक्षण, सामाजिक, राजकीय व्यवस्थेसह अर्थकारण म्हणून हा देश कधीच उभा राहू शकला नाही, याचे कारण या देशाचा कडवा धर्मवादच होय. दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले. पण, आज भारत कुठे आणि पाक कुठे, असा प्रश्न पडतो. उदारमतवादी दृष्टीकोन ठेवत भारताने कायम लोकशाही व्यवस्था सदृढ करण्यावरच भर दिला. भारताच्या सार्वत्रिक प्रगतीचे फळ म्हणजे ही लोकशाही व्यवस्थाच होय. अर्थात इतके सारे होऊनही पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर द्विराष्ट्रवाद उगाळतात, यातून या मंडळींच्या मानसिकतेवर प्रकाश पडतो. या मुनीर यांचे स्थान सध्या डळमळीत आहे. उद्या दुसरे कुणी आले, तरी पाकमध्ये सुधारणा होण्याचे कारण नाही. पाकचा प्रवास उद्ध्वस्त धर्मशाळेच्या दिशेने सुरू आहे, हे नक्की.
Previous Articleपाकिस्तानने मागितले कर्ज, जगभरात फजिती
Next Article 5 सुरक्षा यंत्रणांनी भारताला ठेवले सुरक्षित
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








