रुहान शेख – गोव्याच्या टेबलटेनिस खेळातील एक उगवता तारा, ज्याच्याकडे राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची प्रतिभा आतापासूनच दिसत आहे. मडगावातील 12 वर्षीय रेहान शेखचे नाव भारतीय टेबलटेनिस सर्कीटमध्ये वेगाने बनत आहे. गोव्याचा हा तरुण पॅडलर त्याची असामान्य शिस्त, अपवादात्मक कौशल्य आणि अढळ महत्वाकांक्षेने राज्यभरातील टेबलटेनिस खेळातील प्रशिक्षक, खेळाडू आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सध्या गोव्यात मुलांच्या अंडर 13 गटात अव्वल मानांकित आणि अंडर 15 मध्ये दुसऱ्या मानांकनावर असलेल्या रुहानची रँकिंगमधील वाढ ही समर्पण, प्रगत प्रशिक्षण आणि कुटूंबाच्या मजबूत पाठिंब्याने आकार घेतलेल्या प्रतिभेची कहाणी आहे. रुहान हा उल्हास रायकरच्या यू व्ही अकादमीमध्ये आशुतोष च्यारी व वरुण गांगोडकर या माजी राज्य खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. ‘गेल्या वर्षभरात रुहानची टेबलटेनिस खेळातील वाढ अभूतपूर्व आहे व त्याची सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे त्याची वचनबद्धता. तो कधीही विचलित होत नाही, असे असे आशुतोष च्यारी म्हणतात.
रुहानच्या दैनंदिन दिनचर्येवरून तो खेळाकडे किती गांभीर्याने पाहतो हे दिसून येते. प्रत्येक सत्राची सुरूवात थेराबँड वापरून 20 मिनिटांच्या ‘शॅडो’ सरावाने होते. त्यानंतर टीटी रोबोटसह तीस मिनिटांच्या प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे रुहान स्ट्रोक पुनरावृत्ती आणि सातत्य यावर काम करू शकतो. त्यानंतर, रुहान त्याच्या प्रशिक्षकांसह विविध स्पॅरिंग भागीदारांसह दोन तासांचा सामना-आधारित सराव करतो. प्रत्येक दुसऱ्या दिवशी, तो तीव्र मल्टीबॉल प्रशिक्षण घेतो, जिथे त्याचे प्रतिक्षेप, फूटवर्क आणि अचूकता सुधारण्यासाठी त्याला डझनभर चेंडू वेगाने दिले जातात.
प्रशिक्षकांनी रुहानच्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये आठवड्यातून एकदा बाहेरील फुटबॉल सत्रांचा समावेश केला आहे. ‘हे स्टॅमिना, पायांची ताकद, वेग व सहनशक्ती निर्माण करण्यास मदत करते. आधुनिक टेबलटेनिस खेळाडूसाठी आवश्यक असलेले सर्व गुण त्याच्याकडे आहेत, असे आशुतोष च्यारी स्पष्ट करतात.
याव्यतिरिक्त, रुहानला आठवड्यातून एकदा फातोर्डा येथील दक्षिण गोवा टेबलटेनिस कौन्सिल अकादमीमध्ये सराव करण्यासाठी नेण्यात येते, जेथे राष्ट्रीय रँकिंग सुवर्णपदक विजेता चंदन कारो आणि गोव्याची अव्वल पॅडलर ईशिता कुलासो यासारख्या गोव्यातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत मौल्यवान सामने खेळण्याची संधी मिळते. महिन्यातून एकदा किंवा दोनदा तो पणजीत डॉन बॉस्को ओरेटरीमध्ये प्रशिक्षक सॅल्विन गुदिन्होच्या अकादमीतही सराव करतो आणि विविध खेळण्याच्या शैली आणि तंत्रांचा अनुभवही घेतो.
‘रुहानच्या टेबलटेनिस खेळातील विकासाचा आलेख उल्लेखनीय आहे’ असे पणजी टेबलटेनिस क्लबचे उपाध्यक्ष आणि गोवा टेबलटेनिस संघटनेच्या मिडिया सेलचे अध्यक्ष संदीप हेबळे म्हणतात. गेल्या वर्षी रुहान 13 वर्षांखालील गटात दुसऱ्या सथानावर होता. यावर्षी त्याने त्याच्या खेळाने मोठी झेप घेतली आहे. त्याने राष्ट्रीय स्तरावरील कास्यपदक विजेता युग प्रभूसह अव्वल पॅडलर्सना हरवले आहे. अगदी गेल्या प्रमुख रेंकिंग स्पर्धेत युगला सरळ गेममध्ये हरवले आहे. आणि हे त्याच्या वाढत्या कौशल्य आणि निर्भयतेचे बरेच काही सांगून जाते. त्या विजयामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे, असे हेबळे म्हणाले. यावर्षी गोव्यात टेबलटेनिस स्पर्धांत वाढ झाल्याने, रुहानसारख्या तरूण खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी आवश्यक असलेले व्यासपीठ मिळत आहे, असे हेबळे म्हणाले.
टेबलापलिकडे, रुहान त्याच्या स्वभावाने आणि चारित्र्याने सर्वांना प्रभावित करतो. तो अत्यंत विनम्र, शिस्तप्रिय आहे आणि नेहमी इतरांना अभिवादन करतो. तो जलद शिकणारा आहे आणि महत्वाचे म्हणजे तो दबावाखालीही शांत राहतो, असे आशुतोष च्यारी म्हणाले. त्याची परिपक्वता केवळ खेळातच नाही तर शैक्षणिक क्षेत्रातही दिसुन येते. मनोविकास स्कूलमध्ये सातवीचा विद्यार्थी असलेला रुहान त्याच्या वर्गात टॉपर आहे आणि गणित हा त्याचा आवडता विषय मानतो. ‘खेळ आणि शिक्षण एकमेकांच्या हातात हात घालून जाऊ शकतात याचा तो पुरावा आहे, असे रुहानचे वडील चार्टर्ड अकाउंटंट सैफ शेख म्हणतात.
त्याची आई, नादिया शेख एक गृहिणी आणि रुहानचा सतत आधारस्तंभ आहे. ती प्रत्येक स्पर्धेत त्याच्यासोबत असते. ‘आम्ही दोघेही वेळ आणि जबाबदाऱ्या सामायिक करतो, जेणकरून त्याला प्रशिक्षण आणि स्पर्धांत भाग घेण्यासाठी योग्य वातावरण मिळायला पाहिजे’ असे सैफ म्हणाले.
मजेचे म्हणजे, रुहान त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चार्टर्ड अकाउंटंट बनण्याची आकांक्षा बाळगतो, पण त्याचे मन टेबलटेनिसच्या स्वप्नावर दृढ आहे. ’मला राष्ट्रीय विजेता व्हायचयं आणि ऑलिम्पिकसाठी पात्र व्हायचे आहे’ असे रुहान त्याच्या वयाला न जुमानता शांत आत्मविश्वासाने सांगतो, रुहानच्या यशामुळे त्याच्या कुटूंबातही रस निर्माण झाला आहे. त्याचा लहान भाऊ आरिश हा देखील या खेळात सामील झाला आहे आणि तो गोव्यात मुलांच्या 11 वर्षांखालील गटात त्याला आधीच तिसरे मानांकन आहे.
घरी मजबूत आधार व्यवस्थात, त्याला पाठिंबा देणारे कुशल प्रशिक्षक आणि भविष्यासाठी स्पष्ट दृष्टी असल्याने, रेहानचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. अशा क्रीडा जगात जिथे अनंकदा झटपट प्रसिद्धी मिळते, तिथे रुहान शेखची कहाणी प्रक्रिया, संयम आणि चिकाटीमध्ये ताजी आहे. गोव्याला या युवा पॅडलरचा खूप अभिमान आहे ज्याचे डोळे राष्ट्रीय जेतेपदावर आणि कदाचित एके दिवशी ऑलिम्पिक पोडियमवरही आहेत.
-संदीप मो. रेडकर









