सातारा :
रांची येथे पार पडलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धेतील ट्रॅक सायकलींग स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात रुद्रनिल अजित पाटील याने रजत पदक पटकावले आहे. त्याने सातारा जिल्ह्याचा पहिला सायकलिंगपट्टू होण्याचा मान मिळवला आहे.
तो साताऱ्याच्या मोना स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत आहे. ट्रॅक सायकलींग सरावाकरता तो क्रिडा संकुल बालेवाडी येथे ट्रॅकवर सराव करत होता. तसेच तो दररोज २० किलोमीटर रोड सायकलिंगचा सराव करत होता. या कठोर परिश्रमामुळे व राष्ट्रीय प्रशिक्षक दर्शन बरगुजे यांनी योग्य प्रशिक्षण दिल्यामुळे रुद्रनिलने राष्ट्रीय स्पर्धेत रजत पदक पटकावले आहे.
त्याचे मुळगाव कराड तालुक्यातील वाठार हे आहे. रुद्रनिलला लहानपणापासूनच सायकलिंगची आणि पोहण्याची आवड असून शाळेतही रुद्रनिलकडे स्कॉलर मुलगा म्हणून पाहिले जाते. सातारा येथे सायकलिंगचा ट्रॅक नसल्याने त्याने पुणे येथे जावून प्रशिक्षण पूर्ण केले. त्याने यापुर्वी जिल्हा व राज्यस्तरावर सायकललिंग व स्विमिंगमध्ये अनेक पारितोषिक मिळवली आहेत. मोना स्कूल आणि सातारा जिल्हा क्रिडाधिकारी व त्याची आई प्रा. सौ. प्रियांका पाटील, वडिल अजित वसंतराव पाटील यांनी परिश्रम घेतले. आईवडिलांच्या आर्शिवादामुळे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळवू शकलो असे रुद्रनिलने सांगितले.








