ए-बी खाता देण्यात चालढकल : संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : राज्य सरकारच्या सूचनेनुसार बेळगाव महानगरपालिकेकडून शहरातील मिळकतधारकांना ए आणि बी खात्याचे वितरण केले जात आहे. ई-आस्थी प्रणालीअंतर्गत मिळकतींची नोंदणी केली जात आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, त्या ठिकाणी अनेक जणांचे अर्ज प्रलंबित ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. अशोकनगर येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात असे प्रकार होत असल्याने संतप्त नागरिकांनी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
मिळकतींची ए आणि बी खात्यांतर्गत नोंदणी करून घेऊन मिळकतधारकांना उताऱ्यांचे वितरण केले जात आहे. सुरुवातीला महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत मिळकतधारकांकडून अर्ज स्वीकारले जात होते. त्याच ठिकाणी उताऱ्यांचेही वितरण केले जात होते. मात्र, उत्तर आणि दक्षिण भागातील मिळकतधारकांना यासाठी महापालिका कार्यालयात यावे लागत होते. ही गैरसोय दूर व्हावी, यासाठी प्रभागांमध्ये अर्ज स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे. आलेल्या अर्जांना मंजुरी महसूल उपायुक्तांकडून दिली जाते. मात्र, त्यांचे काम कमी व्हावे, यासाठी झोनल महसूल उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळत आहे. मात्र काही अधिकारी वेगवेगळी कारणे सांगून लोकांची कामे करून देण्यास विलंब करीत आहेत. काही कागदपत्रे कमी असल्याचे सांगत महिनाभर फाईली तशाच टेबलवर पडून आहेत. अशोकनगर येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात लोकांची कामे करून देण्यास विलंब केला जात असल्याने मिळकतधारक वैतागले आहेत. त्या ठिकाणी महापालिकेने नियुक्त केलेले प्रथम दर्जा साहाय्यक (एफडीए) पवन देवरवाडी यांची प्रभारी महसूल निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्याकडून लोकांची कामे करून देण्यात चालढकल सुरू आहे.
याबाबत समाजसेवक इम्रान फत्तेखान यांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या पंचवीस दिवसांपूर्वी दिलेली फाईल हातावेगळी करण्याऐवजी तशीच टेबलवर ठेवण्यात आली आहे. याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे महापौर, उपमहापौर आणि मनपा आयुक्तांनी लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्याची इतरत्र बदली करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









