वृत्तसंस्था/ माँटे कार्लो
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रुडने सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता रुड आणि ग्रिसचा सित्सिपस यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कास्पर रुडने जोकोविचचा 6-4, 1-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. गेल्या वर्षी प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील अंतिम सामन्यात जोकोविचने रुडचा पराभव करत जेतेपद मिळविले होते. या पराभवाची परतफेड रुडने माँटे कार्लो टेनिस स्पर्धेत केली आहे. ग्रीसच्या सित्सिपसने इटलीच्या यानिक सिनरचा फडशा पाडत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे.









