जेसिका पेगुला, स्ट्रायकोव्हा, कुडरमेटोव्हा, लॉरेन्झो मुसेटी यांचेही विजय
वृत्तसंस्था/ विम्बल्डन
रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेलवर सरळ सेट्सनी विजय मिळवित सोमवारपासून सुरू झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. महिला एकेरीत अग्रमानांकित पोलंडची इगा स्वायटेक, चौथी मानांकित जेसिका पेगुला, बार्बोरा स्ट्रायकोव्हा, बॉग्डन, 19 वी मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्का, 12 वी मानांकित व्ही. कुडरमेटोव्हा यांनीही विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली.

रुबलेव्हने मॅक्स पर्सेलवर 6-3, 7-5, 6-4 अशी मात केली. त्याचा विजय विशेष महत्त्वाचा मानला जात असून तो रशिया व बेलारुसच्या एकूण 17 पुरुष व महिला खेळाडूंपैकी एक आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने मागील वर्षी या स्पर्धेत रशियन व बेलारुसियन खेळाडूंवर प्रवेशबंदी करण्यात आली होती. फक्त विम्बल्डनने या दोन देशांच्या खेळाडूंवर बंदी घातली होती. त्यामुळे या स्पर्धेला मानांकन गुण देण्यात आले नव्हते. यावेळी या दोन्ही देशांचे खेळाडू त्रयस्थ खेळाडू म्हणून खेळत आहेत. त्यांना रशिया व बेलारुसकडून आर्थिक साह्या किंवा प्रायोजकत्व स्वीकारता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. रशियाने जेव्हा युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले तेव्हा रुबलेव्हने त्याला विरोध दर्शविला होता आणि एका स्पर्धेवेळी ‘नो वॉर’ असे त्याने कॅमेऱ्याच्या ग्लासवर लिहून युद्धाला विरोध दर्शविला होता. सोमवारी येथे तो खेळावयास कोर्टवर उतरला तेव्हा, शौकिनांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. 2021 मध्ये येथील स्पर्धेत रुबलेव्हने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.
पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात 14 व्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीने दुसरी फेरी गाठली असून त्याने जुआन पाब्लो व्हेरिलासचा 6-3, 6-1, 7-5 असा पराभव केला. महिला एकेरीत अग्रमानांकित इगा स्वायटेकने झु लिनचा 6-1, 6-3 असा सहज फडशा पाडत दुसरी फेरी गाठली. 19 व्या मानांकित बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काने युआनवर 6-4, 5-7, 6-4 अशी मात केली तर चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाने लॉरा डेव्हिसचा 6-2, 6-7 (8-10), 6-3 असा आणि स्ट्रायकोव्हाने झेनेवस्काचा 6-1, 7-5 असा पराभव केला. याशिवाय बाराव्या मानांकित कुडरमेटोव्हाने काया कॅनेपीला 7-6 (7-4), 6-4, बोग्डनने समाओनोव्हाला चुरशीच्या लढतीत 7-6 (7-1), 7-6 (7-4) असे हरवित दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.









