वृत्तसंस्था/ माँट्रियल
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरुषांच्या तसेच महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हने टॉप सिडेड व विद्यमान विजेत्या जेनिक सिनेरचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेत पावसाचा वारंवार अडथळा येत असल्याने काही सामने लांबणीवर टाकण्यात आले आहेत.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रुबलेव्हने सिनेरचा 6-3, 1-6, 6-2 असा पराभव केला. तत्पूर्वी रुबलेव्हने शनिवारी ब्रेंडॉन नेकासिमाचा 6-2, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. रुबलेव्हला शनिवारी दोन सामने खेळावे लागले. इटलीच्या सिनेरने गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. आता माँट्रियल स्पर्धेत जपानचा निशीकोरी आणि अमाल्डी यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर रुबलेव्हची उपांत्य फेरीत गाठ पडेल.
चौथ्या मानांकित हुरकेझचा पॉपीरिनशी सामना होणार आहे. जर्मनीच्या व्हेरेवने रुनेचा 6-3, 7-6 (7-5) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अमेरिकेच्या कोर्दाने टेलर फ्रीझचा 6-4, 7-6 (7-4) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. पॉपीरिनने डिमिट्रोव्हवर 7-6 (7-5), 6-3, हुरकेझने कोकीनेकिसचा 4-6, 6-3, 7-6 (8-6) असा पराभव केला.









