फ्रान्सेस टायफो, डिमिट्रोव्ह, वायमर,व्हेरेव्ह यांचेही विजय, कॅस्पर रुड, फ्रिट्झ, ओस्टापेन्को, क्रेसिकोव्हा, स्टीफेन्स स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
अमेरिकेचा फ्रान्सेस टायफो, मायकेल वायमर, डिमिट्रोव्ह, आंद्रे रुबलेव्ह, लियाम ब्रॉडी, अलेक्झांडर व्हेरेव्ह, कॅरोलिन गार्सिया, डोना व्हेकिक, बेलिंडा बेन्सिक, बियाट्रिझ हदाद माइया यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली तर चौथा मानांकित कॅस्पर रुड, अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ, झेकची क्रेसिकोव्हा, असलन कारात्सेव्ह, लैला फर्नांडेझ, एलेना ओस्टापेन्को यांचे आव्हान संपुष्टात आले.

लियाम ब्रॉडीने कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळविताना डेन्मार्कच्या कॅस्पर रुडला पाच सेट्सच्या झुंजीत पराभवाचा धक्का दिला. त्याने ही लढत 6-4, 3-6, 4-6, 6-3, 6-0 अशी जिंकत सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने असलन कारात्सेव्हचा 6-7 (4-7), 6-3, 6-4, 7-5 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. पहिला सेट गमविल्यानंतर रुबलेव्हने स्वत:ला सावरत सुमारे तीन तास चाललेली ही लढत जिंकली. त्याची पुढील लढत डेव्हिड गॉफिन किंवा मार्सेलो टॉमस व्हेरा यापैकी एकाशी होईल. 19 व्या मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने हॉलंडच्या गिज ब्रॉवरवर 6-4, 7-6 (7-4), 7-6 (7-5) अशी मात केली तर इटलीच्या मॅटेव बेरेटिनीने पावसामुळे लांबणीवर पडलेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात आपल्याच देशाच्या लॉरेन्झो सोनेगोचा 6-7 (5-7), 7-6 (9-7), 6-3 असा पराभव केला

महिला एकेरीत पाचव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाने लैला फर्नांडेझचा रोमांचक लढतीत 3-6, 6-4, 7-6 (10-6) असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. क्रोएशियाच्या डोना व्हेकिकने माजी अमेरिकन चॅम्पियन स्लोअर स्टीफेन्सला 4-6, 7-5, 6-4 असा पराभवाचा धक्का दिला. झेकच्या मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाविरुद्ध तिची पुढील लढत होईल. होन्ड्रूसोव्हाने 12 व्या मानांकित कुडरमेटोव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव केला. अन्य एका लढतीत स्वित्झर्लंडच्या चौदाव्या मानांकित बेलिंडा बेन्सिकने पावणेतीन तासाच्या लढतीत डॅनिएली कॉलिन्सवर 3-6, 6-4, 7-6 (7-2) अशी मात केली. कारकिर्दीत सहाव्यांदा बेन्सिकने या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. पोलंडच्या मॅग्डा लिनेटशी तिची पुढील लढत होईल. याशिवाय जेसिका पेगुलानेही तिसरी फेरी गाठली आहे.
दुसऱ्या फेरीच्या अन्य सामन्यात व्हिक्टोरिया अझारेन्काने नादिया पोडोरोस्काचा 6-3, 6-0 असा धुव्वा उडविला बियाट्रिझ हदाद माइयाने अडीच तासाच्या लढतीत जॅकेलिन क्रिस्टियनचा 4-6, 6-2, 6-4 असा पराभव केला तर सोराना सिर्स्टियानेही अडीच तासाच्या संघर्षात एलेना ओस्टापेन्कोचे आव्हान 4-6, 7-6 (8-6), 6-4 असे संपुष्टात आणले. पोटापोव्हाने काया जुवानचा 6-3, 7-5, रोमानियाच्या अॅना बॉग्डनने अमेरिकेच्या अॅलिसिया पार्क्सचा 1-6, 6-3, 6-2, युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्काने कॅटरिना सिनियाकोव्हाचा 6-4, 6-1 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. अन्य एका सामन्यात मिरा अँड्रीव्हाने जखमी क्रेसिकोव्हाला हरवून तिसरी फेरी गाठली. 16 वर्षीय अँड्रीव्हा 6-3, 4-0 असे पुढे असताना दहाव्या मानांकित बार्बोरा क्रेसिकोव्हाने डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली. तिची पुढील लढत पोटोपोव्हाशी होईल.









