रुबीना दिलैकने स्वत:चा अभिनय अन् गुणवत्तेद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, परंतु मागील काही काळापासून ती टीव्ही स्क्रीनवरून गायब आहे. चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. रुबीना आता एका नव्या प्रोजेक्टसह पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. रुबीना लवकरच गायक अन् अभिनेता इंदर चहलसोबत पंजाबी चित्रपटात दिसून येणार आहे. पंजाबी भाषेतील पटकथा समजून घेणे माझ्यासाठी तुलनेत सोपे होते. कारण मी एका पंजाबी युवकासोबत विवाह केला असल्याने अनेक वर्षांपर्यंत माझ्या आयुष्यात पंजाबचा मोठा प्रभाव राहिला आहे. आम्ही दोघेही पंजाबी चित्रपटांचे चाहते आहोत. अभिनव अन् मी दोघेही जवळपास प्रत्येक पंजाबी चित्रपट पाहत होतो, असे रुबीनाने म्हटले आहे.
पंजाबी चित्रपटसृष्टी स्वत:ची पटकथा, संकल्पनेबाबत उत्तम कामगिरी करत आहे. पंजाबी संगीत अन् भांगडावर तर पूर्ण जग नाचत असून देशातील चित्रपटसृष्टीला देखील हे प्रभावित करत असल्याचे रुबीनाने म्हटले आहे. पंजाबी चित्रपट करण्याची माझी इच्छा नेहमीच राहिली होती, याकरता मी एका चांगल्या प्रोजेक्टचा शोध घेत होते. इंदर चहलसोबतचा चित्रपट पूर्ण कुटुंबाला एकत्रित पाहता येण्यासारखा आहे. मी मूळची हिमाचलची असून पंजाब हे त्याला लागून असल्याने आमच्या घरात नेहमीच पंजाबीचा प्रभाव दिसून आला आहे. मला माझ्या संस्कृतीचे प्रदर्शन करणे पसंत आहे, कारण हे माझे खरे स्वरुप असल्याचे ती म्हणाली.









